पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/१२९

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ११९ )
दुसरे व्यंकटराव नारायण.

व कांहीं एकतर्फी खेडीदेखील बळजबरीनें ताब्यांत घेतलीं. सेनापतींचाही दरोबस्त तालुका त्यानीं लटून फस्त केला. त्या वावटळींतून एक कापशीचें ठाणें मात्र बचावले. इतकें झाल्यावर राजमंडळाची फौज इचलकरंजीवर तिसऱ्यानें चालून आली; तेव्हां मात्र इचलकरंजीकरांच्या कुमकेस कोन्हेरराव पटवर्धन यांची पुण्याहून फौजेसह रवानगी झाली. ती फौज येऊन पोचण्यापूर्वी इचलकरंजीत महादाजीपंत फडणीस होते त्यांच्या राजमंडळाच्या फौजेशी नित्य चकमकी होतच होत्या. कोन्हेरराव यांची फौज समीप आली तेव्हां करवीरकर हटून कोल्हापुराकडे गेले. नंतर कोन्हेरराव व पांडुरंगराव पटवर्धन व महादाजीपंत फडणीस एकत्र झाले, तेव्हां त्यांची बारा हजार फौज जमली. त्या फौजेची व करवीरकरांची तांदुळवाडीवर गांठ पडून युद्ध झालें, त्यांत करवीरकरांचा मोड होऊन ते पळून गेले. त्या युद्धांत कोन्हेररावानीं मोठा पराक्रम केला व त्यांच्या मांडीस गोळीची जखम लागली होती. करवीरकर पळून गेल्यावर दुसरे दिवशीं कोन्हेरराव इचलकरंजीजवळ पंचगंगेवर येऊन उतरले. त्यांच्या भेटीस व्यंकटरावांच्या मातोश्री लक्ष्मीबाई गेल्या होत्या. त्यानीं तो भेटीचा प्रसंग याप्रमाणे वर्णिला आहे. "( कोन्हेरराव ) आज येथे मुक्कामास आले. आम्हीही गेलों होतों. त्यानीं फार प्रकारे पूर्व स्मरोन अगत्याचेच भाषण केले. नंतर ' सरकार आज्ञा तो आहेच, परंतु आमच्याकरितां जखम वगैरे लागून आपणास फार हैराणगत झाली; ' म्हणून आम्ही बोलिलों. इतकें ऐकून ' असे आपण कधीं म्हणों नये. काय तो आशीर्वाद मातोश्रीबाईचा. त्यांच्या पुण्यानें आम्हास यश येणें तें यावयाचे. श्रीमंतांचे पायही बाईंच्या योगें, त्यापेक्षां आपल्या कार्यविशीं शरीरही खर्च झालें तथापि अवघड नाहीं ' असें बोलिलेवर आम्ही निघोन आलों."