करीत होते आणि इकडे त्यांचें संस्थान घेण्याकरितां करवीरकरांची सारखी धडपड चालली होंती !
करवीरकरांवर फौज पाठवून त्यांचें पारिपत्य करावें म्हणून अनुबाईनीं सवाई माधवराव यांच्या कारभाऱ्यास वारंवार प्रार्थना केलीं, परंतु पुणें दरबाराजवळ या वेळीं करवीरच्या मोहीमेस पाठविण्यासारखी फौज नसल्यामुळें शेवटीं अनूबाईंस आपल्या स्वतःच्याच प्रयत्नांवर भिस्त टाकावी लागली. त्या पुरंदराहून निघून मिरजेस आल्या व त्यानीं कर्ज काढून चोहोंकडून फौज गोळा केली. कण्हेरखेडचे रघुनाथराव व नारायणराव शिंदे यांस चारशें स्वारांनिशीं व गोविंदराव नाईक निंबाळकर यांस पांचशे स्वारांनिशीं त्यानीं आपल्या कुमकेस आणिलें. शिवाय मिरजेस दोन हजार स्वार चाकरीस ठेविले व पुण्याहून तोफाही कांहीं विकत आणल्या. मिरजेंत पांडुरंगराव तात्या पटवर्धन होते त्यांनी त्यांस उत्तम प्रकारें मदत दिली व त्यामुळेंच आमचें संस्थान बचावलें गेलें असें अनूबाईनीं कबूल केलें आहे. नारो महादेव यानीं हरिभटजीबावांस उपाध्येपण दिलें त्याचा उपयोग या वेळीं नारो महादेव यांचे वंशजांस उत्तम प्रकारें झाला ! हरिभटजी व त्रिंबक हरि यानीं इचलकरंजी संस्थानाचा कांही दिवस कारभार केला व हल्लीं तिसऱ्या पिढीचे पटवर्धन म्हणजे हरिभटजीबावांचे नातू परशुरामभाऊ, कोन्हेरराव, पांडुरंगराव हे सर्व त्या संस्थानाचा यथाशक्ती सांभाळ करण्यास उत्सुक होते. असो. अनूबाईंवर या वेळीं चोहोंकडून एकदांच संकटें आलीं होतीं. करवीरकरांच्या धामधुमीमुळें संस्थानाचा वसूल तर कांहीं आलाच नव्हता, पण तिकडे धारवाडचा सुभा हैदरअल्लीनें ग्रासल्यामुळे लाखों रुपयांचें नुकसान झालें होतें !