पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/१२६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ११४ )
इचलकरंजी संस्थानाचा इतिहास.

कडून कोल्हापूरकरांस जरब बसवून कांहीं बंदोबस्त होतो कीं नाहीं हें पहावें अशा बेतानें अनूबाई पुण्यास गेल्या. त्या तिकडे गेल्यावर इचलकरंजीवर वर लिहिल्याप्रमाणें कोल्हापुरकरांची स्वारी आली. परंतु अनूबाईंनीं इचलकरंजींत महादाजी विठ्ठल फडणीस यांस ठेविलें होतें, त्यानीं कोल्हापूरकर येतांच त्याशीं लढाई सुरू केली. या व पुढील दोन तीन वर्षांत कोल्हापूरकरानीं इचलकरंजीवर निरनिराळ्या वेळीं स्वाऱ्या केल्या असतां इचलकरंजीकरानीं त्याशीं कसें युद्ध केलें याच्या तपशिलाची माहिती इचलकरंजीकरांच्या बखरींत दिली आहे, ती सबंध येथें देण्याचें कारण नाहीं. कारण कीं, इचलकरंजी दप्तरांतलीं निवडक पत्रें आम्ही अलहिदा छापलीं आहेत, तीं वाचिलीं असतांही या युद्धाचें स्वरूप कळण्याजोगें आहे. आम्ही त्या स्वाऱ्यामधल्या ठोकळ ठोकळ गोष्टी मात्र येथें नमूद करूं. महादाजी विठ्ठल हा शूर मनुष्य होता. त्यानें या पहिल्या स्वारींत करवीरकरांशीं पंधरा दिवस पर्यंत उत्तम रीतीनें टक्कर दिली. उभयपक्षीं एकमेकांचे गांव लुटणें व जाळणें, खंडण्या घेणें व ठाणीं काबीज करणें, हे सर्व प्रकार होऊन करवीरकर पराजित होत्साते परत गेले.
 पुन्हां सुमारें पांच महिन्यांनीं करवीरकर सात आठ हजार स्वार व पायदळ व चार तोफा घेऊन स्वारीस आले. याही खेपेस बऱ्याच झटापटी होऊन इकडचें व तिकडचें पांचशे मनुष्य जायां झालेंं. नंतर आपणास इचलकरंजीकर बधत नाहींत असें पाहून राजमंडळाची फौज परत गेली. करवीरकरांच्या या स्वाऱ्या न व्हाव्या म्हणून अनूबाईनीं पुण्याच्या दरबारीं पुष्कळ खटपट केली, परंतु सखारामबापू व नाना फडणवीस यानीं कोल्हापुरकरांस पत्रें पाठवून वारंवार निषेध केला असतांही त्यानीं त्यांस जुमानलें नाहीं. व्यंकटरावदादा आपल्या पथकानिशीं पेशवे सरकारच्या फौजेबरोबर चाकरी