पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/१२५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ११६ )
दुसरे व्यंकटराव नारायण.

पेशवाई तरी आपणास पादाक्रांत करितां येईल असें मानण्याइतकें करवीरदरबार मूर्ख नव्हतें हें खचित. मग त्यांस पाहिजे होतें तरी काय ? त्यांस मुलूख मिळवावयाचा होता असें म्हणावें तर सत्पक्षास म्हणजे पुण्याच्या कारभाऱ्यांस ते अनुकूल होते तर मुलूखही मिळाला असता. निजामअल्लीसारख्या हितशत्रुस अथवा हैदरअल्लीसारख्या शत्रूस ज्यानीं मुलूख दिला त्यांनीं स्नेहभावानें मदत करणाऱ्या करवीरकरांस तो दिला नसता असें कांहीं नाहीं ! सवाई माधवराव खोटे असल्याबद्दल प्रथम अफवा होती त्या वेळीं सत्पक्ष कोणता व असत्पक्ष कोणता, हें आपणास कळलें नाही असें म्हणण्याची सबब तरी त्यांस होती. पण निजामअल्ली, शिंदे, होळकर, इंग्रज यानीं पक्की खात्री करून घेतली, पुरंदरचा तह झाला, त्यानंतर तरी करवीरकरानीं विरुद्ध मार्ग सोडावयाचा होता ! परंतु तसें न करितां उलट दादासाहेबांस पेशवाईचीं वस्त्रे देऊन व हैदरअल्लीशींं मिलाफ करून ते पेशवाईची अधिकाधिक अगाळिक करूंं लागले ! असल्या वर्तनानें त्यांस काडीमात्र फायदा झाला नाहीं. उलट त्यांनीं जिजाबाईच्या वेळचा कारस्थानीपणाचा लौकिक होता तो गमविला आणि " छत्रपति " शब्दांत जी काय जादू भरली होती तीही नाहींशी करून टाकिली !
 हल्ली दादासाहेबांकडून व हैदरअल्लीकडून कोल्हापूरकरांस इशारा झाला कीं, पेशवे व त्यांचे सरदार यांच्या मुलखांत तुम्हीं लुटालूट करावी. ती त्यांची मनापासून इच्छा होतीच ! त्यांतून त्यांस याप्रमाणें उत्तेजन मिळाल्यावर मग काय विचारावें ? येसाजी शिंदे वगैरे राजमंडळाचे सरदार १७७४ च्या अखेरीस फौज व तोफा घेऊन इचलकरंजीवर चालून आले. इचलकरंजीकर यानींही लढाईची तयारी चांगली केली होती. अनूबाईनीं करवीरकरांशी सलोखा करावा म्हणून पुष्कळ यत्न केला, परंतु ते बिलकुल ऐकेनात ! तेव्हां पेशवे सरकारा-