पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/१२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( २ )
इचलकरंजी संस्थानाचा इतिहास.

फार प्रसिद्ध अशीं आहेत. त्यांस अनुक्रमें नवकस व सातकस अशीं नांवें आहेत. या नांवांच्या अर्थाबद्दल कित्येकांनीं नाना प्रकारचे तर्क केले आहेत. परंतु सार्वत्रिक समजूत अशीं आहे कीं, बादशाही कारकीर्दीत कोणा एका काळीं कापशीकरांच्या घराण्यांतले नऊ पुरुष सरदारीचा अधिकार चालवीत होते व त्याच वेळीं मुधोळकरांच्या घरांतले सात पुरुष तेंच काम करीत होते. एकेका कुळांतले इतके पुरुष एकाच वेळीं राजकीय उलाढालींत प्रमुख असल्याचें पाहून लोकांस कौतुक वाटे; शिवाय या उभय कुलांमध्यें भाऊबंदकीची स्पर्धा असल्यामुळें एकमेकांवर पराक्रमाची चढाओढ चालू होती, या मुळें कापशीकर 'नवकस' व मुधोळकर 'सातकस' अशा नांवांनीं लोकांत प्रसिद्धि पावले. ही सार्वत्रिक समजूत आम्हांस बरोबर वाटते. कारण ‘असामी' या अर्थीं ‘कस' शब्दाचा प्रयोग जुन्या कागदपत्रांत केलेला आमच्या पाहण्यांत आहे. कापशीकर व मुधोळकर ही दोन्हीं घराणीं विजापूरच्या बादशाहींत लष्करी कामांत उत्कर्ष पावलीं होतीं व दोघांसही या बादशहांकडून सरंजाम व मानमरातब चालत होते.
 विजापूरच्या बादशहाकडून कापशीचें ठाणें व त्याभोंवतालचा कांहीं तालुका कापशीकरांकडे सरंजाम म्हणून चालत होता. त्यांस ‘हिंदुराव' हा किताब बहामनी बादशहांच्या वेळेस मिळालेला असावा. 'अमीर-उल्-उमराव' हा किताब मात्र त्यांस विजापूरच्या बादशहांकडून मिळालेला आहे. कोल्हापूर प्रांताची देशमुखी व सरदेशमुखी कापशीकरांकडे कधी आली हें समजत नाहीं. तथापि ती विजापूरकरांच्या अमदानींत त्यांजकडे चालत असवी असा तर्क करण्यास जागा आहे. कारण कीं, विजापूरच्या बादशाहींत कापशीकरांच्या जोडीचे दुसरे मराठे सरदर फलटणचे निंबाळकर, मलवडीकर घाडगे, म्हसवडकर माने, जतकर डफळे व वाडीकर सावंत हे सर्व देशमुखच होते व शेजारच्या