Jump to content

पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/११७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
(१०७)
दुसरे व्यंकटराव नारायण.

 नारायणराव तात्यांचें चरित्र येथवर सांगितलें आहे, त्यासंबंधे त्यांच्या स्वभावाचें वर्णन व त्यांच्या कृत्यांची योग्यायोग्यता यांबद्दल टीकारूपानें विस्तार करण्यासारखें काही दिसत नाहीं. त्यांच्या स्वभावांत कांहीं शूरत्व व कर्तृत्व असलेंच तर तें इतकें अल्प होतें कीं, तें अनूबाईंच्या शिरजोरपणाखालीं सहज दडपलें गेलें! आपल्या संस्थानाची भरभराट करून घेण्याची त्यांस उत्तम संधि मिळाली असतां ती त्यानीं गमाविली असेंच म्हटले पाहिजे. मोठमोठाल्या मामलती,तैनाता व बक्षिसें मिळाली तरी तीं आज आहेत, उद्यां नाहींत, अशा प्रकारचीं असतात. पेशव्यांकडून आपली सरदारी वाढवून तिच्या खर्चासाठीं त्यानीं अधिक सरंजाम मिळविला असता तर संस्थानास कायमचा फायदा राहिला असता. पण तशी सरदारी वाढवून घेण्याचें कर्तृत्व नारायणराव तात्यांच्या अंगीं असतें तर त्यांस टाकून पटवर्धनांची नवी सरदारी उभारण्याचे पेशव्यांस कांहींच प्रयोजन नव्हतें!



व्यंकटराव नारायण ऊर्फ दादासाहेब.

 इचलकरंजीकरांकडून धारवाडचा सुभा काढून तो दुसऱ्या मामलेदाराकडे पेशव्यानीं दिल्याचें मागें लिहिलेंच आहे. सुमारें सोळा वर्षेपर्यंत तो सुभा त्यांजकडे होता. त्या अवधींत मामलतीसंबधें तफावत रहातां रहातां आजपर्यंत सरकारची बाकी बरीच तुंबली होती.