Jump to content

पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/११६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
(१०६)
इचलकरंजी संस्थानाचा इतिहास.

श्रीमंतांची कृपा संपादून आपलें कल्याण करून घ्यावें याविषयी अनूबाई व वेणूबाई वगैरे यानीं बहुत यत्न केला. परंतु सरदारीचें काम अलीकडे तात्यांस आवडेनासें झालें होतें त्यामुळें ते इचलकरंजी सोडून पुण्यास आले नाहींत, आणि त्यांस तेथें टाकून अनूबाईनीं पुण्यास यावें तर ते मागें काय उत्पात करितील न कळे, हें अनूबाईंच्या पोटांत भय होतें. बाईचें पुण्यास न जाणें झाल्यामुळें दौलतीचीं, वतनाचीं व सरदारीचीं कामें दरबारांत तटून राहून नुकसान होत असे. सन १७६९ त कर्नाटकच्या स्वारीस तात्यांस पाठवावयाचें पेशव्यांच्या मनांत आलें होतें, परंतु बहुधा तात्यांच्या नाकर्तेपणामुळेंच तो बेत रहित झाला असावा.
 या म्हणजे सन १७६९ साली धारवाडचा सुभा इचलकरंजीकरांकडून काढून पेशव्यानीं नारो बाबाजी नगरकर यांस सांगितला.तेथील मामलेदार येसाजीराम व रामचंद्र नारायण यांच्या हातून नीट बंदोबस्त राहून सरकारचा वसूल येईनासा झाला, सबब याप्रमाणे व्यवस्था करण्यांत आली. नगरकरांकडे सुमारे दोन वर्षे तो सुभा होता. त्यानंतर येसाजीराम यानें पुनः दरबारीं वशिला लावून व अधिक पैसा कबूल करून तो सुभा आपले नावें करून घेतला.
 सन १७७० व १७७१ सालीं कर्नाटकांत हैदरअल्लीवर मोहीम सुरू होती तीत इचलकरंजीकरांची पागा मात्र होती. पथकाचे सरदार विसाजीनारायण व हरिराम हे मरण पावल्यामुळें व नारायणराव तात्या बेहोष व व्यंकटराव दादा अल्पवयी असल्यामुळें तूर्त इचलकरंजीचें पथक मोडल्यासारखेंच झालें होतें.
 नारायणराव तात्या हे सन १७७० च्या प्रारंभापासून आजारी पडले होते. तें दुखणें वाढत जाऊन शेवटीं त्याच वर्षाच्या नोवेंबर महिन्याच्या १० वे तारखेस त्यांचें देहावसान झालें.