पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/१०७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
(९७)
नारायणराव व्यंकटेश.

खजिना व बंदिवान हें सर्व हवालीं करून घेऊन राखणें व परचक्र आलें तर त्याशीं लढाई करणें हें जेथपर्यंत आपण करीत आहों, जेथपर्यंत आपण राज्याशीं हरामख़ोरी केलीं नाहीं, तेथपर्यंत आपणास काढण्याचा पेशव्यांस आधिकार नाही, हें किल्लेकऱ्यास माहीत होतें! एखाद्या शंभर स्वारांच्या पथक्यास तू स्वारांचे पथक मोडून पायदळाचें पलटण तयार कर असें पेशव्यानीं सांगितलें तर तो पथक्या म्हणणार कीं, महाराजांच्या वेळेस जसा सरंजाम होता तसा बाळगून मी चाकरी करीत आहें. त्या बाहेरची गोष्ट मला करावयास सांगण्याचा तुम्हांस आधिकार नाही ! यद्यपि एखादा पथक्या कबूल झाला, तरी त्याचे कारभारी, मुजुमदार, फडणीस व स्वारसुद्धां असली गोष्ट कबूल करावयाचे नव्हत ! कारण तेही सारे मिरासदारच ! महादजी शिंद्यानीं पलटणे तयार केलीं तीं दिल्लीच्या बादशहाच्या दौलतींतून! तें काम ते मराठी राज्याच्या उत्पन्नांतून करूं जाते तर मिरासदारानीं उलट त्यांचेच उच्चाटन केलें असतें! या मिरासदारीमुळे सरदारांस भय नाहीसे झालें, कशी बशी चाकरी करून दिवस काढण्याची चाल पडली, आणि त्यामुळें राज्याची वाढ खुंटली. राज्यांतल्या फौजा गोळा करून पेशव्यानीं परमुलखीं स्वाऱ्या करून महाराष्ट्रांत दोलत आणावी, राज्य वाढवावें, व त्यांतलें तेज व उत्साह कायम राखावा, अशी शाहू महाराजांची मनीषा होती. एक दोन पेशवे बरे निघालें तोपर्यंत या मनीषेचें साफल्य होत गेले. परंतु पुढे तो प्रकार बंद पडतांच मराठी राज्य इंग्रजांच्या तडाक्यानें कपाळमोक्ष करून घेण्याची वाट पहात बसलें !!!
 सातारच्या महाराजांस नामधारी बाहुलें करून पेशव्यानीं राज्याधिकार भोगिला असें म्हणण्याची प्रवृत्ति पडली आहे. परंतु तो केवळ त्यांचाच अपराध नसून त्या कालमहिम्याचा अपराध होता हें१३