पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/१०६

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
(९६)
इचलकरंजी संस्थानाचा इतिहास.

पायमल्ली न व्हावी, व ती रयत निर्भय व संतुष्ट रहावी, म्हणून शाहूमहाराजांनीं मराठी साम्राज्य ‘शिवस्व' म्हणून पेशव्यांच्या हवालीं केलेंं. थोरल्या मुलावर संसाराचा व कुटुंबाचा भार सोंपवून एखाद्या मनुष्यानें महायाञेस जावें त्याप्रमाणें महाराजांनी पेशव्यांवर राज्य सोंपवून कैलासवास केला. ती जबाबदारी ओळखून पेशव्यांनीं हें 'शिवस्व' यथाशक्ति संभाळिलें यांत काय संशय ? त्यांनी कोणाच्याही दौलतीचा अभिलाष केला नाहीं, अपराधावांचून कोणास शासन केलें नाही, सामर्थ्यानें उन्मत्त होऊन कोणास पायांखाली तुडविलें नाही, रावापासून रंकापर्यंत सर्वांचे मानमरातब व सरंजाम यथास्थित चालविले, हें त्यांस मोठे भूषणास्पद आहे. महाराजांनीं भोंसले-गायकवाडांस आधिकार दिला असता तरी याहून अधिक त्यांचे हातून खचित झालें नसतें ! नाना फडनवीस हयात होते तोंपर्यंत पेशवाईचे हे सर्व कायदे निर्वाधपणें चालले. रावबाजीच्या कारकीर्दीत मात्र त्यांस हरताळ फांसला गेला त्याचे फळही त्या उल्ल पेशव्यांस तत्काळ मिळालें!
 शाहूमहाराजांच्या स्वार्थत्यागानें मराठी राज्याचें आत्यंतिक कल्याण झालें असें मात्र मुळींच नाही. आजचें मरण उद्यांवर ढकललें गेलें इतकेंच काय तें झालें! असें होण्याचें कारण ‘धड ना धनी ना नोकर' अशी पेशव्यांची स्थिति हेंच होय. शाहूमहाराजांच्या ज्या सनदेनें पेशव्यांस अधिकार मिळाला त्याच सनदेनें मराठी राज्यात आपापल्या क्षेत्रापुरते असंख्य पेशवे आपोआप निर्माण झाले ! राज्य कारभाराचे सर्व चातुर्य काय ते ‘जुनें मोडूं नये. नवें करूं नये.' या वाक्यव्दयांत समाविष्ट होऊन बसलें! महाराजांच्या वेळचे सरंजाम, तैनाता, अधिकार या सर्वांस मिरासदारीचा हक्क प्राप्त झाला! पेशव्यांस एखादा किल्ला पाहिजे असला तरी त्यांस किल्लेदाराचा मिराशी हक्क आडवा येऊं लागला! कारण कीं, सरकारचें धान्य,