Jump to content

पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/१०४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ९४ )
इचलकरंजी संस्थानाचा इतिहास.

स्वकार्यसिद्धी करून जिजाबाई परत करवीरास गेल्या. पुढें लवकरच त्यांनी दत्तक पुत्र घेऊन त्यांचें नांव शिवाजीमहाराज ठेविलें.
 जिजाबाईंच्या या आटोकाट खटपटीमुळें संभाजी महाराजांच्या वेळेस करवीर राज्याचा जो दर्जा होता तोच कायम राहून शिवाय त्याची स्थायिकता कायमची झाली. संभाजीमहाराजांच्या जागी त्यांच्या दत्तकवंशासही लेखण्याचे पेशव्यानीं कबूल केल्यामुळे ते नोकराच्या नात्यानें बांधले गेले व करवीरकर मात्र बेजबाबदार धनीपणा प्राप्त झाल्यामुळे पाहिजे ते करण्यास मोकळे राहिले ते राहिलेच ! त्यांनी किती फितूर व दंगे केले तरी पेशवे आपले राज्य घेतील हें भय त्यांस कधींच वाटलें नाही !

 पेशवाईच्या अधिकारासारखा अधिकार दुनियेंत कधीं कोणी चालविला नसेल ! पेशवे दिल्लीच्या बादशहाचे सुभेदार, छत्रपतींचे प्रधान व आपल्या स्वतःच्या राज्यापुरते मालक होते. हे तीन विजातीय संबंध एके ठिकाणीं आल्यामुळें या व्यक्तींचे म्हणजे पेशव्यांचें राज्ययंत्र बरेंच विकट व नाजूक झालें होतें ! बादशहाचे नोकराशीं म्हणजे सुरत, जंजिरा, सावनूर, अर्काट वगैरे संस्थानांच्या नबाबांशीं दोस्त सरकार या नात्यानें त्यांस वागावें लागे. हे संस्थानिक चौथ सरदेशमुखीच्या ऐवजी फक्त खंडणी देण्यास पात्र होते. निजामाशीं पेशव्यांचा संबंध त्याहून अधिक निकट होता. कारण कीं, मोंगलाईच्या सहा सुभ्यांत ठाणीं बसवून चौथ सरदेशमुखीचा वसूल परभारें घेण्याचा प्रघात पेशव्यानीं यापूर्वी पुष्कळ दिवस पाडिला होता, त्यामुळे मोंगलाई व पेशवाईचे नफानुकसान एकच असल्यामुळें हर्षामर्षाचे प्रसंग वारंवार येत. हे सर्व परके संस्थानिक वगळले म्हणजे राज्यांत पेशवाईस स्वतःहूनही वरिष्ठ अशी दोन संस्थाने होती. त्यांपैकीं