Jump to content

पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/२८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तर बिंदू ३२° फॅ. इतकासुद्धा पुरेसा होतो. मग रक्तात गुठळ्या होऊच शकत नाही. लायनोलिक व लायनोलेनिक फॅ. अॅसिडस्चे प्रमाण १० पेक्षा खाली असेल तर तेल अपायकारक होऊच शकत नाही. दैनंदिन आपली तेलाची गरज सुमारे २५ ते ३० ग्रॅम असते म्हणजे महिना पाऊण किलो. यात जर २ चमचे रोज तूप पोटात गेले तर याचा विचारही फारसा करण्याची जरुरी राहत नाही. आहारात चघळ चोया (Fibre) मात्र भरपूर असावा. साधे तेल रिफाइन्ड तेलापेक्षा अतिशय श्रेष्ठ असते.
 अमेरिकेत प्राणीजन्य फॅट ही मांसाहारामधून खूपच जात असते. ही जवळजवळ ३०० ते ५०० ग्रॅ. पर्यंत पोटात जात असतात. यासाठीच यात मोठ्या प्रमाणावर कपात करण्याचा सल्ला दिला जातो. डॉ. डीन ऑर्निश यांनी हे सविस्तर लिहिले आहे. यामुळे हृदयविकार बरा होण्यास मदत होते, असलेले ब्लॉक्सही कमी होतात. या निरोगी दिनचर्येमध्ये आहार, ध्यानधारणा, योगाभ्यास व व्यायाम यांना महत्त्वाचे स्थान आहे. ही पूर्वपीठिका आपण नीट समजावून घेतली व तसे वर्तन केल्यास धोका टळू शकतो. देह-मन-संबंधात ध्यानधारणेला फार महत्त्व आहे. त्याच्या रीती आपण जरा सविस्तरपणे पाहू. पण या विकारावर सुद्धा ध्यानधारणेचा अत्यंत उपयोग होतो.
ध्यानधारणा :
 ध्यानधारणा ही तशी सोपी नाही. यम, नियम, आसन, प्राणायाम व प्रत्याहार या त्यापूर्वी आत्मसात करणे इष्ट ठरते. पण त्यापेक्षा निरनिराळे सोपे मार्ग आपण पाहिले आहेत. ते सर्वच सर्व रोगांवर उपयोगी पडू शकतात. पण विकाराचे नीट सामान्य ज्ञान झाल्याशिवाय त्यावर मन केंद्रित होणार नाही. म्हणूनच शरीरशास्त्र व विकार यांचा आढावा आपण प्रत्येक वेळी घेत आहोत. या ठिकाणी आपण शवासनातील ध्यान पाहू. शवासन तसे अत्यंत अवघड आहे. यासाठी अगदी पायाच्या अंगठ्यापासून मन केंद्रित करून एक पाय, दोन्ही पाय, पोट असे करत करत सर्वांग पूर्णपणे ताणरहित करणे ही प्रथमावस्था. याला सवय करावी लागते. गाढ झोपेत असताना आपले शरीर पूर्णपणे ताणरहित झालेले असते, नाडी मंद व ठोके अगदी कमी होतात. हीच अवस्था जागृतावस्थेत असणे याचे नाव शवासन.

शवासनात ॐकार ध्यान अत्यंत उपयोगी आहे. ओंकाराची आकृती ॐ अशी असते.

२८७