(वरील त्रिदोषांच्या स्वरूपाचे वर्णनात्मक श्लोक पाठ करण्यासारखे आहेत म्हणून दिले आहेत. )
आयुर्वेदांतील त्रिदोषांचे याप्रमाणे सामान्य स्वरूप आहे. मानवी शरीर जोपर्यंत बाधारहित व अव्याहतपणें नित्य व्यापार करीत होतें तो पावेतो त्याचा विचार स्वाभाविक रीतीनेंच उद्भवला नाहीं. व त्याचे व्यापार नीट चालेनात, दुःख होऊं लागले, कर्तबगारी आणि ताकद कमी दिसूं लागली व अनुभूत जे शतसांवत्सरिक आयुर्मान त्यांतहि कमतरता क्वचित् दिसूं लागली. अर्थातच या आपत्तीचे प्रतीकारार्थ तिचे स्वरूप, कारणपरंपरा इत्यादींचा विचार करता करतां ओघानेच शरीराचा, आकार, पदार्थ, कार्य, 'उत्पत्तिस्थिविनाशात्मक जीवनव्यापार यांविषयीं विचारहि सुरू झाला व प्रथम सहज दिसणाऱ्या स्थूल पदार्थांचें आणि त्यानंतर तर्कानुमेय सूक्ष्म पदार्थांचे संशोधन सुरु झालें. व शेवटीं शरीरांतील नित्य घडामोडींत ज्यावर सर्वस्वी शरीर अवलंबून आहे असला शरीराच्या सर्व घटकांतील एक कार्यकारी अणुसमुदाय हाच शरीरांत महत्वाचा पदार्थ म्हणून मानण्यांत आला. व या कार्यकारी पदार्थाचे अनुभवसिद्ध असें त्रिविध कार्य जें संग्रह, पचन व उत्सर्जन त्यावरून शास्त्रीय दृष्ट्या हा अणुसमुदाय तीन प्रकारचा मानण्यांत येऊ लागला. आयुर्वेदारंभी ठरविलेले "वायुः पित्तं कफश्चेति, तीन दोष म्हणजे हेच त्रिविध अणु होत. आयुर्वेदामध्ये या शरीरतत्वविषयक सिद्धांताविषयीं इतका विश्वास रूढ झाला की या त्रिदोषांविषयीं पौनःपुन्याने विचार करण्याची अवश्यकताच राहिली नाही. त्यांचा निरनिराळ्या शरीरविभागांतील संबंध कार्यक्रम, शारीरपदार्थांतील व सृष्टीतील पदार्थातील विविध गुणांशी त्यांचे विशिष्ट प्रकारचें साधर्म्य इत्यादि धोरणानें रोगीनिरोगी स्थितीतील सर्व शारीरिक क्रियांशी त्यांचा संबंध एका विशिष्ट पद्धतीनें अनुभवसिद्ध ठरला. याच पद्धतीनें चिकित्सेत येणाऱ्या उत्तम यशाने ह्या त्रिदोषांच्या कल्पनेला गृहीत सिद्धांताचे शास्त्रज्ञसंमत स्वरूप येऊन
" वातपित्तश्लेष्माण एव देहसंभवहतेवः । तैरेव अव्यापन्नैः अधोमध्योर्ध्वसंनिविष्टैः शरीरमिदं धार्यतेऽगारमिवत्स्थूणाभिस्तिसृभिस्तश्च त्रिस्थूणमाहुरके |