पान:आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना (Amhi Bi Ghadalo Tumhi Bi Ghadana).pdf/९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कहाणी घडण्याची
  'कोणाची आहे ही कहाणी?' असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडलेला असणार. ही कहाणी आहे, तुमच्या आमच्या सारख्याच गावाकडच्या बायांची. ज्यांना शिक्षणाचं पाठबळ नाही की पैशाचं. घरी दारी उजाडल्यापासून निजेपर्यंत कष्ट करायचे, स्वत: चुलीचे चटके खाऊन घरच्यांचं पोट भरायचं अशांची.
 घरातल्या बाईबद्दल एवढं सांगण्यासारखं काय असणार? आणि ते पण अख्खं पुस्तक भरून? असा विचार पडला का?
  महिलांना एकदा खात्री झाली की त्या कुठलीही गोष्ट लगेच उचलून धरतात. सुरूवात झाली एका गावातल्या एका गटामधल्या २० जणींपासून आणि आता या उपक्रमात २८०० महिला १७२ गटांमधून एकत्र येतात. पैशाचे-पैशाबाहेरचे व्यवहार करतात. बघता-बघता गटांची संख्या इतकी वाढत गेली, की एकेका गावामध्ये ७-८ किंवा त्याहीपेक्षा जास्त गट बसायला लागले. वरवे गावात तर २२ गट आहेत म्हणजे गावातली घरटी बाई गटात आहेच म्हणा की. असा उपक्रम महिलांना आपला वाटल्याने रूजला. बचत गटाचा एवढा मोठा पसारा, तोलून सावरून धरलाय स्थानिक संघटिकांनी! आधी स्वत:च्या गटांचं मग गावांचं आणि मग चार गावांचं कामकाज पार पाडायला या संघटिका शिकल्या. एरवी चारचौघींसारख्याच, पण त्यांच्या धडपडीमुळं आणि तळमळीमुळं, बचत गटाची खरीखुरी ताकद बनल्या आहेत या महिला!
 अनेक प्रकारच्या महिलांना गटांनी आधार दिला. तरूण सुनांना, का-सावरत्या महिलांना, एकटी दुकटीला, तर कधी एकटी नवऱ्याच्या मागे, तर कधी नवरा असतानासुद्धा. या सगळ्याजणी स्वत: घडल्या आणि स्वत: घडताना त्यांनी स्वत:च्या घराला घडवलं.५ वर्षांमध्ये गावा-गावातून,


तुम्ही बी घडाना ॥