पान:आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना (Amhi Bi Ghadalo Tumhi Bi Ghadana).pdf/८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

व्यवस्थापन करायला, योग्य प्रकारे पैसे वापरायला, त्यासंबंधीचे निर्णय घ्यायला शिकल्या. घराबाहेर पडून नवनवीन स्वयंरोजगाराची कौशल्ये त्या शिकल्या. ती वापरून पैसे मिळवायलाही महिला शिकल्या. मुख्य म्हणजे घराचा उंबरा ओलांडायला स्त्रिया शिकल्या. घरचं बघून गावचं कसं करायचं तेही शिकल्या ...... या साऱ्यातून अनेकींच्या कंटाळवाण्या झालेल्या आयुष्यात नवीन तरतरी आली, उत्साह आला, त्यांचं सुनेपण गेलं आणि नवचैतन्य आलं! गट जरी व्यवहारासाठी सुरू झाले असले, आर्थिक फायद्यासाठी सुरू झाले असले, कुणा एकीच्या सांगण्यावरून सुरू झाले असले, बचत गटातून घडलेल्या बदलाची ताकद बघून सुरू झाले असले, सामाजिक गरज म्हणून सुरू झाले असले तरीही ते सारे गट आता या साऱ्या प्रक्रियेचा भाग बनले आहेत. एकटीला न करता येणाऱ्या अनेक गोष्टी साऱ्याजणी 'गटाच्या ताकदीमुळे' सहज करू लागल्या आहेत, त्यातून त्या स्वावलंबी बनत आहेत. या साऱ्या घडणी'मुळे बऱ्याच काळापासून वाट बघणारे मूलभूत सामाजिक बदल आता नजरेच्या टप्प्यात आले आहेत.
 केवळ संधीची वाट पहाणाऱ्या महिलांसाठी प्रबोधिनीमुळे नियमित चालणाऱ्या गट बैठकीमधून पोषक वातावरण मिळाले, त्यांच्यातील सुप्त गुणांना प्रगट होण्याचे स्वातंत्र्य मिळाले व प्रबोधिनीतून व्यावहारिक मार्गदर्शन मिळाले. या साऱ्या गोष्टींमुळे समाज परिवर्तनासाठी लागणारं स्थानिक नेतृत्व आता हळूहळू तयार होतंय.
 शिवगंगा, गुंजवणी खोऱ्यांत प्रबोधिनीने जाणीवपूर्वक केलेल्या या प्रयत्नांमुळे ही अशी प्रक्रिया अनेक गटांमध्ये, वाड्या-वस्त्यांवर, गावागावांमध्ये सुरू झाली आहे. ती स्थानिक पुढाकारामुळे रूजत आहे, पसरत आहे. त्यामुळे जागोजागी जमणारे हे गट नुसतेच व्यवहारापुरते मर्यादित राहिले नाहीत तर त्यातून एक सूत्रबद्ध अशी चळवळ उभी राहिली आहे. सप्टेंबर २००० पर्यंत म्हणजे केवळ सव्वापाच वर्षातच ४५ गावांमध्ये १७२ गटांमधून साधारण २८०० महिला या उपक्रमात सहभागी झाल्या आहेत.
 असा सारा, ग्रामीण महिलांच्या आत्मप्रचीतीचा हा विलक्षण प्रवास आपण पानापानांमधून अनुभवणार आहोत.


आम्ही बी घडलो।