पान:आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना (Amhi Bi Ghadalo Tumhi Bi Ghadana).pdf/७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

घडण संघटिकांची....
 ज्यांची ओळख करून घेतल्याशिवाय ही घडण्याची कहाणी पूर्ण होणार नाही. अशा बचतगट संघटिकांची ही ओळख.
 गटामध्ये येऊन थोडी-थोडी जबाबदारी घ्यायला शिकता शिकताच या सगळ्याजणींचा विश्वास इतका वाढला, की त्या संघटिका झाल्या. कोणतंही काम टिकायचं आणि वाढायचं असेल, तर स्थानिक लोकांनी ते काम आपलं मानायला लागतं. अशा स्थानिक संघटिका तयार झाल्या, हीच या कामाची खरी ताकद. या त्यांच्याच गावच्या महिलांची ताकद, मर्यादा अन् अडचणीही चांगल्याच जाणून असतात. त्यांनी त्या कधीतरी अनुभवलेल्या असतात. म्हणूनच गटांना वळण कसं लावायचं हे समजू शकतं. त्यामुळे अनेकीनां त्या आता आदर्श वाटत आहेत.
 मला काहीतरी चांगले काम करायचय, पण संधी मिळत नाही" असं म्हणणाऱ्या सातवी शिकलेल्या गंगूताईंना, हिशोब चांगले येत होते, म्हणून त्या हिशोब सांभाळायला लागल्या. ते करताना लिहिण्या-वाचण्याची गोडी लागली. आता त्या बी. ए. च्या पदवीची पूर्वपरीक्षा देण्याची तयारी करत आहेत.
 माहेरी परत आलेल्या आशाताई गोगावल्यांना, गटात येऊन हरवलेला सन्मान परत मिळाला. "मला आधार मिळाला तसा बाकीच्यांनाही मिळाला पाहिजे," अशा इच्छेनं त्या संघटिका झाल्या. धीटपणे बोलणं, मोठ्या रकमांचे व्यवहार करणं त्या शिकल्या एवढंच नाही तर बैठकीच्या निमित्ताने गावोगावी जाऊन गटाचा सांगावा त्यांनी इतराना दिला त्यासाठी रात्री गावांना मुक्कामही केला असं काम करण्याचा पायंडा त्यांनी प्रथम घातला. एकटीलाही गटाचे पाठबळ असलं, तर स्वतःला कसं घडता येत. याचा धडाच त्यांनी घालून दिला.
 माझ्या शिक्षणाचा उपयोग झालाच पाहिजे," असं म्हणून आशाताई सुर्वे सगळ्या गटांचे हिशोब चोख सांभाळतात. त्यांनी गटाच्या कारभाराचा
तुम्ही बी घडाना ॥               ६७