पान:आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना (Amhi Bi Ghadalo Tumhi Bi Ghadana).pdf/७०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

याला 'सबसिडी मिळते का?' या प्रश्नावर अडून बसत नाही. आलात तर तुमच्या बरोबर, नाही आलात तर तुमच्याशिवाय ! पण आम्ही पुढं जाणार हे नक्की आहे, असा विश्वास स्वत:च्या हिंमतीमुळे येतो.
पतसंस्था
 गटांमधून आणि सरकारी योजनांमधून महिला वेगवेगळ्या प्रकारचे, मोठ्या प्रमाणातले आर्थिक व्यवहार करायला शिकत आहेत. या व्यवहारांची पुढची पायरी म्हणजे पतसंस्था किंवा महिलांची सोसायटी. पतसंस्थेचं काम म्हणजे लोकांना, संस्थांना कर्जपुरवठा करणे. आतापर्यंत पतसंस्थेचं काम म्हणजे पुरूषांचंच काम. महिलांनी चालवलेली पतसंस्था ही कल्पना महिलांनाही नवी वाटली आणि गावालाही नवी वाटली. गटाचे व्यवहार २० जणींचेच, तर पतसंस्थेचे व्यवहार खोरे पातळीवरचे. गटातल्या तिघी गटप्रमुखांनी मिळून भावकीतल्या महिलांचेच व्यवहार बघायचे,तर पतसंस्थेत गावातली, आजूबाजूची पुरूषमंडळी, गावातल्या संस्था, निरनिराळी मंडळं, यांच्याबरोबर व्यवहार बघायचे. त्यासाठी हिंमत पाहिजे,हुशारी पाहिजे आणि व्यवहार चोख पहाण्याची कुवत पाहिजे. आता महिला स्वतःची परीक्षा करून बघणार आहेत, की कुठवर आलो आहोत आपण? किती शिकलो? आपली ताकद किती?
 चुका होतील याची तयारी आहेच या महिलांची, पण एकेक चूक समजून घेण्याची आणि त्यानंतर जास्त हुशारीने, जास्त तयारीने सुरूवात करण्याची कुवत आपल्यात आहे अशा विश्वासानंच त्या ही सुरूवात करणार आहेत.
आता मनात घोळतंय की,
 पतसंस्थेचं काम, त्याचं राजकारण महिलांना पेलेल का?
 मोठ-मोठ्या सरकारी योजनांमध्ये त्यांचा निभाव लागेल का?
६४                आम्ही बी घडलो।