पान:आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना (Amhi Bi Ghadalo Tumhi Bi Ghadana).pdf/७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

प्रस्तावना
 ज्ञान प्रबोधिनी ही संस्था ग्रामविकसनाचे काम पुणे जिल्ह्यातील भोर, वेल्हे, हवेली या तालुक्यात असलेल्या शिवगंगा, गुंजवणी नद्यांच्या खोऱ्यांमध्ये गेली ४० वर्षे करत आहे. महिलांसाठीच्या कामास सुरूवात करून साधारण १५ वर्षे झाली. ग्रामीण भागातील महिलांची आर्थिक व सामाजिक स्थिती सुधारल्याशिवाय विकासाचं गाडं पुढे जाणार नाही हे तेव्हाच समजलं होतं. दारूबंदी आंदोलन, स्वयंरोजगार प्रशिक्षण, निर्धूर चुली प्रकल्प, व्यक्तिविकास व नेतृत्व विकासाचे प्रशिक्षण असे विविध उपक्रम महिलांसाठी चालू होते. त्याद्वारे महिलांमध्ये मोठ्या प्रमाणावर जाणीवजागृती होत होती. वेचून वेचून एकेकीसाठी घेतलेले परिश्रम दिशा देणारे ठरत होते तरीही त्यामुळे घडलेले सामाजिक परिवर्तन. टिकून राहाण्यासाठी पुरेसे वाटत नव्हते.
 जून १९९५ मध्ये ज्ञान प्रबोधिनी संस्थेतर्फे महिलांसाठी शिवगंगा, गुंजवणी खोऱ्यात पहिल्या बचत गटाला सुरूवात झाली. अगदी साध्या, सोप्या आणि औपचारिक पद्धतीने पैशाचे व्यवहार करायच्या निमित्ताने ग्रामीण महिला बैठकीसाठी एकत्र जमू लागल्या. स्वत:साठी कधीही बाहेर न पडणाऱ्या अनेकजणी प्रथमच या निमित्ताने घराबाहेर पडल्या. त्यामुळे त्यांच्या जाणिवेच्या कक्षा रूंदावल्या. महिलांसाठी असणारी अनेक बंधने व त्यांच्या मर्यादा लक्षात घेऊनही, महिन्यातून एकदा होणाऱ्या बचत गट बैठकीमुळे व त्या निमित्ताने होणाऱ्या इतर उपक्रमांमुळे, महिलांच्या सुप्त गुणांच्या विकासाला आणि कर्तृत्वाला एक विधायक दिशा मिळाली. कमी शिक्षण, अपुरं व्यवहारज्ञान यामुळे कायमच मागे पडणाऱ्या महिलांसाठी, नियमित होणारी बचत गटाची बैठक ही एक शिक्षणाची पर्वणीच ठरली.
 आर्थिक व्यवहाराच्या निमित्ताने साऱ्याजणी दडपणाशिवाय पैसे हाताळायला शिकल्या, स्वत:च्या हिंमतीवर पैशाचे व्यवहार करायला शिकल्याच शिकल्या पण त्या व्यवहाराची जबाबदारीही घ्यायला शिकल्या. त्यातून योग्य


तुम्ही बी घडाना ॥ १