पान:आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना (Amhi Bi Ghadalo Tumhi Bi Ghadana).pdf/६९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

दिशा भांडवल गटाची
 प्रत्येक सभासदाचे महिन्याला २५ रुपये गोळा करून दर महिन्याला बचत रूपाने ५०० रुपये जमतात त्यात व्याजाची भर पडते, परतफेड जमा होते पण तरी तीन, चार वर्षांनंतरही महिन्याची जमा काही ३५०० पेक्षा जास्त जमेना. ही रक्कम थोडीशी वाटू लागली. या कमी पडणाऱ्या रकमेमुळे गटा गटामध्ये वादावादी सुरू झाली. धंड कुणाचीच गरज पुरेशी भागेना कारण सोप्या पद्धतीने व कमी दरानं पैसे मिळत असल्यामुळे त्या उचलीच्या भरवशावर आता पैशाची कामं बेतली जाऊ लागली होती. ह्या अडचणींवर सभासदांनीच उपाय काढला. गटावरचा विश्वास वाढल्यावर महिन्याला २५ ऐवजी ५० रुपये बचत, १०० रुपये बचत अशी करायला सुरूवात झाली. त्यामुळे व्यवहार मोठ्या रकमांचे व्हायला लागले. त्यातून खात्रीशीर कामे होऊ लागली. मग मात्र शिवापूरच्या कान्होपात्रा थोरातांनी ह्यामध्ये 'भांडवल गटाची' संकल्पना मांडली. ज्यांना मोठ्या उलाढाली करायच्या आहेत, जोखमीची कामं करायची आहेत, उद्योग करायचा आहे त्यांनी महिन्याला २०० रुपये बचत करायची आणि म्हणता म्हणता गट तयार झाला. त्याचं नाव ठेवलं 'श्री भांडवल गट.' वर्षभरात त्यातून एकरकमी ५,००० रुपयांचे एकरकमी अर्थसाहाय्य घेणाऱ्या १५ जणी तरी आहेत. त्याशिवाय किरकोळ अर्थसाहाय्य वाटपही झालेच. या गटाचे यश बघून इतरही काही गावांनी ही कल्पना उचलून धरली. सणसवाडीमध्ये याच धर्तीवर एक अभिनव प्रयोग महिलांनी करायचा ठरवला. महिन्याला प्रत्येकी ५०० रुपये जमा कराचे व त्यातून प्रत्येकीनं एक म्हैस खरेदी करायची. गटाला सुरूवात झाली. त्याच नाव ठेवलं 'गोधन बचत गट.
 करायला लागलं की जमायला लागतं, जमायला लागलं की नवीन सुचायला लागतं आणि त्यातूनच विविध कल्पना मूळ धरतात. मग कुणी
तुम्ही बी घड़ाना ॥              ६३