पान:आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना (Amhi Bi Ghadalo Tumhi Bi Ghadana).pdf/६६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्यातून महिला विकास होतो त्यामुळेच वेगवेगळ्या सरकारी योजनेत याचा समावेश केला आहे.
उद्योगी हाताला - शासनाचं पाठबळ
 दारिद्रय निर्मूलनासाठी गावांमध्ये रोजगार निर्माण व्हावा, उद्योग सुरू व्हावेत यासाठी महिलांना मोठमोठ्या रकमेचा कर्जपुरवठा करणाऱ्या 'महाराष्ट्र ग्रामीण पतपुरवठा योजना आणि स्वर्णजयंती रोजगार योजना शासनाने कार्यान्वित केल्या आहेत. अशा योजनांमुळे दोन गोष्टी होतात -- मोठ्या रकमा हाताळण्यासाठी महिलांची तयारी होते आणि बँक आणि इतर सरकारी यंत्रणा कसे काम करतात याचा जवळून परिचय होतो. योजनांमध्ये महिला बचत गटांना खूपच महत्त्व आहे. सर्व कर्ज व्यवहार हा गटाद्वारे सभासदांशी होतो व त्यांना उद्योगाचे प्रशिक्षण दिले जाते. त्यासाठी, दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील महिला असणे ही अट आहे. या योजनांमुळे खूप मोठमोठे व्यवहार घडू शकतात परंतु जर गटातील महिलांची. तयारी, हे सारे पेलण्याइतकी झाली नसली तर मात्र खूपच मोठा धोका असतो. एक तर गावातील पुरुषच महिलांच्या नावाने परस्पर व्यवहार करतात किंवा ह्या योजनांमधून मिळालेले पैसे योग्य प्रकारे वापरले जात नाहीत.
 शासनाचे पैसे योग्य प्रकारे कारणी लावण्यासाठी रूळलेले अनुभवी बचत गट, उलाढाली करणारे बचत गट हाच चांगला मार्ग आहे यावर शासनाचा विश्वास बसला आहे. आता तो विश्वास सार्थ करण्याची जबाबदारी अशा योजनेतल्या गटांची आहे.
जिजामाता प्रबोधन समिती
 एखाद्या गावामध्ये एकापेक्षा जास्त गट सुरू झाले म्हणजे प्रत्येक गटात काय चाललंय हे माहीत होत नाही. जर गटांची संख्या ८ पेक्षा
६०                 आम्ही बी घडलो।