पान:आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना (Amhi Bi Ghadalo Tumhi Bi Ghadana).pdf/५९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कर्ज फेडण्यासाठी कितीकांचं घरचं आणि दारचं काय काय सावकारांपाशी गहाण पडलं, कित्येकींचे दागिने मोडले, तर कुणाची नक्षत्रासारखी गुरं विकावी लागली, कुणाच्या वावराचा तुकडा गेला आणि आता मजुरी करत वणवण फिरणं नशिबी आलं. कुणाला पोरीच्या लग्नाचा खर्च करायची ऐपत नाही म्हणून किती जणींच्या लेकी बाळींना बिजवर नवरे करायला लागले.
 सावकारीचा विळखा, त्याचा फास सगळ्यांनाच. पण सावकाराकडून उचल तर घ्यायला लागायचीच. अडीनडीला दुसरा कोणताच आधार नाही, करणार काय?
 एक दिवस ससेवाडीच्या महिलांची बैठक बसली. संस्थेच्या ताईंनी त्यांना बचतीची माहिती दिली, एका म्हणीची आठवण करून दिली " थेंबे थेंबे तळे साचे." तशी काहीजणींनी हिंमत बांधली, आणि बचतगट सुरू केला.
 सुरुवातीला महिला बैठकीला निघाल्याम्हणजे घरातून विचारायचे 'कशाचा गट'. पण हळूहळू घरच्या सगळ्यांना कळायला लागलं, की बचतगटाचा आपल्या अडीनडीला आधार होतो. कुणाचं आजारपण, कुणाचं शिक्षण, कुणाच्या घरचे लग्नकार्य उरकते. त्यामुळे जसजसे दिवस जात गेले तसतसे गट तयार होत गेले. बचतगटांना मदत करणाऱ्या संस्थांकडून मोठी कर्ज घेण्यासाठी मदत मिळायला लागली. बायकाबायका मिळून हजाराच्या घरातल्या रकमा हाताळायला शिकल्या. ४ वर्षांत ससेवाडीत १०,००० पेक्षा जास्त पैसे हाताळणाऱ्या कमीत कमी ७० जणी तरी आहेत. गटातून पैशाची येवढी मदत झाल्यामुळे घरच्यांची तोंडं आपसूक बंद झाली.
 आता घरातली गडीमाणसंच भुणभुण लावतात' गटातून काय सोय हुती का ते बघ.' आधी घरातून बाहेर पडायचं,चार पावलं जायचं तरी
तुम्ही बी घडाना ॥             ५३