पान:आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना (Amhi Bi Ghadalo Tumhi Bi Ghadana).pdf/४१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 'मी शिकल्याली नसली म्हणून काय झालं? लेकीला ब्येस शिकवतीया. पोरगी कालिजात जाती. त्यातूनबी येळ काढून संस्थेच्या ताईंबरोबर, गावातल्या शाळकरी पोरींना काय-काय शिकवती. मी तर तिला भूकंपातल्या लोकांना मदत करायला बिहारला पाठवलं होत. आन् अजून लई शिकायचंय तिला, मोठं व्हायचं म्हनती.'
 आई लेकीला घडवू शकते ती अशी! गटातून पैसे काढून त्यांनी मोठं घर बांधलंय, परक्या गावात स्वत:च्या हिंमतीवर घर बांधणं सोपं नाही! तेही त्यांनी केलं.
  बचत गटाला भांडवल गटाची कल्पना दिली ती कान्होपात्रा थोरातांनी, अशी नवीन कल्पना सुचायला शिक्षण लागत नाही, की पैशाचं पाठबळ लागत नाही. त्यासाठी त्यामध्ये मन गुंतायला लागतं आणि गरज भागवण्याची धडपड असावी लागते. असं असलं की सगळं सोपं होऊन समजायला लागतं.

इथे गट जमतात

 महिला म्हणून आपण कुठेही राहात असलो, कितीही कमी जास्त शिकलेल्या असलो, तरी एक गोष्ट आपल्याला सर्वांनाच सारखी आहे - ती म्हणजे बंधन! दबाव ! कसं वागायचं? कसं बोलायचं? कुणाशी बोलायचं? अगदी उठायचं कुठे? बसायचं कुठे याची सुद्धा बंधनं असतात. वर्षानुवर्ष याआधी जे कुणी केलं नाही ते मीही करायचं नाही, असा संस्कार मनावर असतो.
 शिवप्रदेशातल्या महिला गटात यायला लागल्या आणि याच्यात थोडे थोडे बदल व्हायला लागले. महिलांनी अमुकच ठिकाणी बसायचं, किंवा बसायचं नाही, अशी बंधने दूर सारायची हिंमत हळूहळू महिलांना यायला लागली.

-----

तुम्ही बी घडाना ॥                 ३५