पान:आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना (Amhi Bi Ghadalo Tumhi Bi Ghadana).pdf/४०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

जाऊबाईंनी त्यांच्या बचतगटाची माहिती सांगितली. अडी-अडचणीला आधार होईल म्हणून मोहोरताईंना मोठा हुरूप वाटला, आणि त्या नियमित गटात यायला लागल्या. गटाबद्दल विश्वास आला, तसं गटातल्या बाकीच्या मैत्रिणीचं बघून, त्यांनीही अर्थसाहाय्य घ्यायचं धाडस केलं. परक्या गावात राहून पैशाची उचल घ्यायची तयारी दाखवायची म्हणजे हिमतीचंच नाही का?
 पहिलीच उचल रुपये ५००० ची घेतली गावाकडच्या शेतीसाठी आणि या उचलीनं केवळ शिवापुरातल्या मोहोराताईंच्या घरातच नाही, तर बीडमधल्या घरामध्ये सुद्धा लक्ष्मी आली.
 गटातून घेतलेल्या उचलीच्या आधारावर मोहोराताईंनी कांद्याची लागवड केली. वेळेवर पैशाची मदत झाल्यानं लहानशाच जमिनीच्या तुकड्यावर भरघोस पीक आलं. चांगला भाव मिळाला आणि ५००० च्या उचलीवर मोहोरताईंनी ९००० रुपये मिळवले. अर्थसाहाय्य तर फेडलेच शिवाय खर्च वजा जाऊनही वर मिळकत झाली.
 स्वत:ला सापडलेलं सुख-समाधान मोहोराताईंनी स्वत:पाशीच मात्र नाही ठेवलं. त्यांच्यासारख्याच उपऱ्या कुटुंबाची नड त्या विसरल्या नाहीत. स्वत:च्या अनुभवामुळं, परक्या गावात गटाचा आधार मिळणं म्हणजे काय हे त्यांना चांगलंच ठाऊक झालेलं होतं. म्हणूनच त्यांनी अशा महिलांचा गट सुरू केला.
 अशीच कथा त्यांच्या जाऊबाईंची - कान्होपात्रा थोरातांची. त्याही अशीच हिंमत करून गटात आल्या आणि शेतीसाठी अर्थसाहाय्य घेतले आणि त्यांनाही शेती परवडायला लागली. त्यांनी ठरवलं, स्वत:ला जे कळलं ते ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत पोचवायचं, हेच कान्होपात्राबाईंंच वेगळेपण, त्या म्हणतात 'दुसऱ्यांचं भलं करायचं ठरवलं, तर कमी शिक्षण आड येत नाही, की घरची गरिबी आड येत नाही.'

-----

३४                 आम्ही बी घडलो।