पान:आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना (Amhi Bi Ghadalo Tumhi Bi Ghadana).pdf/३७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

लावतात , मग आपण का नाही प्रयत्न करायचा?
 माहेरी असताना भारती थोडं शिवण शिकली होती. त्याचा उपयोग करून गावातल्या महिलांसाठी साड्यांना फॉल- पिको लावायचा उद्योग सुरू करावा असं भारतीनं ठरवलं. धीर करून बोलणं केलं, आणि गटातून पहिली उचल रुपये ५०००/- घेतली. पुण्यातून फॉल-पिकोचं मशिन आणलं आणि स्वतःचा उद्योग सुरू केला. धंद्यात जम बसला. महिन्याला ५० साड्यांना फॉल -पिको लावून त्याच मिळकतीतून आणि यजमानांकडून अशी हप्त्या-हप्त्याने उचल फेडून झाली. उद्योग कशाचा करायचा हे भारतीनं नेमकं ओळखल्यामुळे हे घडलं.
 भारतीचा कामातला व्यवस्थितपणा, उत्साह बघून ताईंनी एक वेगळाच उद्योग तिला सुचवला. 'फोटो काढण्याचा ' गावामध्ये फोटो काढायला रोज-रोज येणार कोण? तर आपल्या गटातल्या बायकाचे, गटातल्या तीन प्रमुखांचे बँकेत खाते उघडण्यासाठी फोटो द्यावे लागतात आणि शिवापूरच्या आसपास गट इतक्या वेगाने वाढतायत, की दर ८- १५ दिवसांनी कुठे ना कुठे फोटो काढायला लागतातच. ताईंनी कॅमेरा भारतीला भाड्याने वापरायला दिला. मनातून भारतीला जरा धाकधूकच, फोटो काढताना कुणी बघितलं तर ? पण कॅमेरा जरा हाताळल्यावर विश्वास आला आणि भारती रुबाबात फोटो काढायला लागली. गटातल्या महिलांचं काम गटातल्या महिलेनंच करायला सुरूवात केली आणि गटातला पैसा गटामध्येच खेळता राहिला. शिवाय दहा ठिकाणी ओळखी झाल्या हा फायदा वेगळाच.
 गटाच्या निमित्तानं भारतीताईंच्या अंगच्या उद्योगाच्या गुणांना संधी मिळाली. एकदा संधी मिळाल्यावर त्यांनी ती पुरेपूर वापरली अणि मग अजून जबाबदारीचं काम घ्यायची हिंमतही आली. त्यानंतर ७ जणींचा शिवाई गट करुन, शिवाई नावाने गटानं उद्योग करायचा ठरवला. खांद्यावर

-----
तुम्ही बी घडाना ॥              ३१