पान:आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना (Amhi Bi Ghadalo Tumhi Bi Ghadana).pdf/३५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

शिकण्याची नवीन पायरी होती. संस्थेच्या ताईंची, संस्थेची मदत होती, पण पुढाकार आणि धडपड मात्र या दोघींची.यातून चुकत आणि त्यातून शिकत-शिकत, खडू उद्योगाचा जम बसला.आता तालुक्याच्या गट विकास अधिकाऱ्यांच्या मदतीने वेल्हे तालुक्यातील सर्व शाळा त्यांच्या मेंगाई बचत गटाचे खडू वापरायला लागल्या आहेत. दिलेल्या मालाची वसुली कशी करायची असंही त्यांचं शिक्षण सुरू झालं आहे.
 या उद्योगाच्या अनुभवातून दोघीही कितीतरी गोष्टी शिकल्या, माणसांच्या आणि पैशाच्या व्यवहाराच्या. उषाताई आणि पद्माताई एकदा पुण्यात गेल्या. संस्थेत त्यांना दिसलं की देवपूजेचं सामान म्हणून निरनिराळ्या प्रकारच्या गवताच्या काड्या, काही झाडांच्या काटक्या अगदी लहान बोटाएवढ्या त्यांच्या जुड्या करून विकायला ठेवल्या होत्या. त्या ठराविक गवताच्या काड्यांना म्हणायचं दर्भ आणि ठराविक झाडांच्या काटक्यांना म्हणायचं समिधा. या शहरात कुठून मिळणार? तेव्हा या अशा रानातून आणून विकायला ठेवतात, आणि लोकं रुपयाला एक अशा भावानं ही एक बारकी जुडी विकत घेतात.
 दोघींनी त्या दर्भ, समिधांच्या झाडांची नावं विचारून घेतली. नंतर असं सामान मिळणाऱ्या बाजारचा फेरफटका करताना दोघींनीही मुद्दाम ठिकठिकाणच्या समिधा-दर्भ बघितले. आणि त्यांच्या लक्षात आलं, की भलत्याच नावाखाली भलत्याच काटक्या आणि गवताच्या काड्या विकल्या जात होत्या!.
 परत जाताना दोघींच्याही डोक्यात चक्र सुरू होतं. आपल्याला रान इतकं चांगलं ओळखीचं, तर आपणच का नाही सगळं गोळा करून विकायला सुरूवात करायची? आणि झालं सुरू!
 कोणतं गवत, कोणती झाडं, एका जुडीत किती मापाचे तुकडे, सगळं नीट समजावून घेतलं. फावल्या वेळात रानात, ओढ्याकाठी

-----
तुम्ही बी घडाना ॥              २९