पान:आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना (Amhi Bi Ghadalo Tumhi Bi Ghadana).pdf/२६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आवरत हुते म्हनून मला येळ झाला. आतापातुर कधी असं वाटलंच नव्हतं बघा, पन बैठकीला यायचं म्हणजे चारजणीत यायचं, तवा वाटलं चांगली डोई विंचरावी, चांगलं लुगडं नेसावं.जरा पावडर लावावी. तसं आवरून मग म्या निघाले, गटात यायला लागल्यापासून वाटतंया काय तरी करावं.पुढारपण शिकावं, गटात यायला लागले, तशी नवीन काहीतरी करायचा लई उल्हास वाटतो बगा. आतापोतुर कुनाची साथ बी न्हवती, अन् कुनाचा आधार बी."
 साथ नाही, आधार नाही म्हणून काही करता येत नाही असं वाटणाऱ्यांना जेव्हा ती साथ, तो आधार मिळतो, तेव्हा त्यांची आयुष्यच बदलून जातात,
माझी नवी ओळख
 “आज १८ वरसं झाली मालकासंग संसार करून. पन मला कधी हिंमत नव्हती झाली इचरायची, की दुधाचं किती पैसं आलं ? आज माझ्या नावावर उचल घेऊन ही म्हैस घेतलीया म्हणून ही हिंमत आली.आतापोतर तीन म्हशी मालकांनी आणल्या. त्या म्हशींचं चारापाणी मीच बघते पण त्या माझ्या वाटायच्या नाहीत, या म्हशीचं तसं नाय. माझ्या नावावर पैसे उचलून ही म्हैस घेतलीया, म्हनून ही म्हैस, मला माझी वाटतीया, ती माझ्या हौसेची म्हणून तिचं नाव ठेवलया हौसा" ससेवाडीतल्या रंजाबाईंच्या घरात गटामुळं नुसती म्हैसच आली नाही, तर रंजाबाईंचा स्वतःसाठीचा सन्मानही, त्या जोडीनं आला.
गटानं मला बळ दिलं
 "चार वर्षांपूर्वी मला धड तीन- चार वाक्यंसुद्धा बोलायला जमत नव्हती. काय बी जमत नव्हतं. आता तुम्हीच बघताय केवढा फरक पडलाय तो."

२०          आम्ही बी घडलो।