पान:आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना (Amhi Bi Ghadalo Tumhi Bi Ghadana).pdf/२२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

किरकोळ कर्ज ७ ते १०% दरमहा दरानं मिळत होतं. खरं तर हा दर २ किंवा ३ टक्के असायला हवा होता. पण त्या गटाला काही पटत नव्हतं. शेवटी निर्णय गटाचा होता. दर ठरला दरमहा ४% गट सरू झाला,उलाढाली सुरू झाल्या. सगळी अर्थसाहाय्य हातउसनी सारखी वाटप व्हायची. कारण सेवाशुल्क दर परवडायचा नाही. मग एका उदाहरणातून पटवलं की महिन्याला ४ % म्हणजे दोन वर्षात मुद्दलीइतकं व्याज होते. पण कशातही रक्कम गुंतवली तरी दोन वर्षात १०० रुपयांचे २०० रुपये होत नाहीत म्हणजेच १०,००० रुपयांची म्हैस घेतली तर मुद्दल दुग्ध व्यवसायातून फिटायला कमीत कमी साडेतीन वर्ष तरी लागतात. मग म्हैस खरेदीसाठी गटाचा दर कसा परवडायचा? यावर चर्चा झाली. रक्कम गुंतवायची असेल तर दर कमी पाहिजे हे हळूहळू पटू लागलं. मग मात्र ४% चा १ वर्षांनी ३% झाला. २ वर्षांनी अजून कमी होऊन आता २% झाला. त्यामुळे गरजेच्या कामासाठी सुद्धा महिला गटातून पैसे उचलायला लागल्या, कारण हा दर परवडायला लागला. विहिरीच्या इंजिनसाठी उचलले पैसे तरी वर्षा-दोन वर्षाच्या पिकानं फिटू लागले. त्यामुळे गटातून मिळणाऱ्या पैशाच्या विश्वासावर लोक गुंतवणूक करू लागले.
स्वत:ला मुरड घालायची, अळीमिळी गुपचिळी सोडायची !
 गटामुळं एखादी गोष्ट करायचं दडपण येतं. म्हणजे जसं मिसरी लावणं हे वाईट आहे असं माहीत असतं पण सोडणं जमत नाही. अशावर वेल्ह्याच्या तोरणा बचत गटानं चांगला उपाय काढला. तोरणा बचत गटाची बैठक रात्री जेवल्यावर व्हायची, तेव्हा तर मिसरीची तल्लफ फारच यायची. सगळ्याजणी मिसरी लावून यायच्या. मग गट चुपचाप कुणीच तोंड उघडायचं नाही. काहींना हे पटेना. आणि जिच्या घरी बैठक व्हायची तिचं घर पार 'काळं' होऊन जायचं. मग गटात त्यावर चर्चा झाली आणि

१६         आम्ही बी घडलो।