पान:आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना (Amhi Bi Ghadalo Tumhi Bi Ghadana).pdf/११

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 गटामुळे नव्या माहितीची देवाण-घेवाण होते, नव्यानं क्षितीजाची ओळख होते आणि त्यातून सुरू होतात उद्योग. उद्योग करायचा झाला तर त्यासाठी खूप भांडवल लागत नाही की शिक्षण लागत नाही! त्यासाठी लागते ती उद्योगसंधी शोधायची नजर आणि मग ती संधी स्वीकारण्याची, जोखीम घेण्याची ताकद! असा सांगावा देणाऱ्या गावोगावच्या उद्योजिका आपल्याला कधी त्या दिसतात हॉटेल चालवण्यातून हिंमत आणि मान मिळवणाऱ्या द्वारकाताई, तर कधी उद्योग कशाचा करायचा हे अचूक हेरणाऱ्या उषा आणि पद्मा गायकवाड, तर कधी बचत गटासाठी पिशव्या शिवता-शिवता आणि बचत गट प्रमुखांचे फोटो काढताना उद्योगी बनलेल्या भारतीताई, माहेरी परतून आलेल्या आशाताई, गावात महिलांची ताकद निर्माण व्हावी म्हणून उत्साहानं प्रयत्न करायला पुढे सरसावतात तेव्हा त्यांची हरवलेली हिंमत परत मिळते आणि स्वत:ला घडवता-घडवता त्या संघटिका होऊन काही गावांचा कारभार सांभाळायला शिकतात.
 त्यातून आपल्या गटाची जबाबदारी पाहता-पाहताच, अजून दहा गटांची, एवढंच नाही तर इतर गावांची जबाबदारी सांभाळणाऱ्या आशाताई, सीमाताई, गंगूताई, बायजाताई, सुनीताताई यांच्यासारख्या संघटिका गावा- गावातून उभ्या राहिल्या. 'माझ्या घरचं तर मी बघणारच, पण बचत गटाचा कारभारही पेलणार' अशा जिद्दीनं काम करणाऱ्या गावोगावच्या महिला हीच बचत गटाची लाखमोलाची ठेव.
 गटाच्या पातळीवर बघितलं तर दिसतं, की गटा-गटातल्या महिला जशा बदलल्या तशा वाढल्याही. महिला वाढल्या तसे त्यांचे गटही वाढले. 'संस्थेतून गट घ्यायला कुणी कार्यकर्ती गेल्याशिवाय, गट व्यवस्थित होत नाही' अशी परिस्थिती बघता-बघता पालटली आणि शिस्तीनं, समजूतीनं व्यवहार करणारे गट आता नवलाईची गोष्ट राहिली नाही.
 गावात किती तरी वेळा अशा महिला असतात की ज्यांना काहीतरी चांगलं करायचं असतं, पण नक्की काय ते कळत नसतं. मनात कल्पना असल्या तरी साथ मिळत नसते. गटाच्या रूपानं अशा महिलांना ही संधी मिळाली.

-----

तुम्ही बी घडाना ॥