पान:आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना (Amhi Bi Ghadalo Tumhi Bi Ghadana).pdf/१०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

घरा-घरामधून छोटे छोटे बदल घडायला लागले. मोठा बदल घडायला हवा असेल तर असेच छोटे बदल खूप मोठ्या प्रमाणावर व्हायला लागतात. तसं बचत गटामधून झालेलं दिसतंय.
  काही ठिकाणी गावं सावकारीच्या विळख्यातून मोकळी झाली, गहाण पडलेल्या जमिनी सोडवल्या गेल्या, दुष्काळी शेतीला आधार झाला, हक्काची घरं झाली. कुणाच्या दावणीला गुरं आली, तर कुणाच्या घरात गॅस, नळ झाले. बायांचे कष्ट हलके झाले. पोरींच्या शिक्षणासाठी महिलांच्या हातात हकाचा पैसा यायला लागला. महिला उद्योग करायला लागल्या.
 पण हे सगळं अचानक नाही घडलं, महिलांनी बचत गटाच्या आधारानं ते घडवलं. ही केवढ्यातरी हिमतीची गोष्ट नाही का?
 'बाया जमल्या म्हणजे निस्त्या कालवा करणार!' असं म्हणणा-या गावकन्यांना गटानं एकत्र आल्यावर महिलांची ताकद काय असते ते दिसलं.
 'बायांची अक्कल चुलीपाशी' असं म्हणणाऱ्या समाजाला बायांची अक्कल कुठे-कुठे चालू शकते ते दिसलं.
 'मी बाईमानूस ! मला काय जमतंय ?असं म्हणणाऱ्या महिला ताठ मानेनं जगायला, स्वत:ला काय-काय जमू शकतं ते शोधायला शिकल्या. समाजानं आणि स्वत:च घालून घेतलेली चौकट ओलांडायचं त्यांनी धाडस केलं. त्यामुळे अनेक जणींमध्ये उल्लेखनीय बदल झाले. त्यांची उदाहरणे आता त्यांच्या गावातल्या इतर महिलांसमोर आहेत. कुणाकुणाची उदाहरणं द्यायची?
 शिवापूरच्या वनशिवबाईंना गटासमोर मान वर करून वाक्य ही बोलता येत नव्हतं, पण जेव्हा गटाचं बळ मिळलं, तेव्हा मेळाव्यातसुद्धा त्या ताठ . ! मानेनं बोलू लागल्या.
 'मला कोणीतरी समजून घेतं,माझ्या नडीला हक्काची मदत मिळते.' 'माझ्या शब्दाला कोणीतरी विचारतं.' म्हणून घराघरातल्या सरूबाई, पारूबाईला गटामुळे जगण्याची उभारी मिळाली. नवीन काही करण्याची हिंमत आली.

आम्ही बी घडलो