पान:आमची संस्कृती.pdf/97

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

९० / आमची संस्कृती

केवळ चातुर्वण्र्याचीच नव्हे, तर अर्वाचीन जातिसंस्थेची व विशेषतः ब्राह्मणांचीच वकिली जोराने व आग्रहाने केलेली आढळते.
 ब्राह्मणांची विद्या व त्यांचे संस्कृतिरक्षणाचे कार्य ह्याबद्दल केतकरांना विशेष अभिमान होता. त्यांच्या मते हिंदुस्थानांतील निरनिराळ्या वन्य व इतर जातींचा हिंदू समाजात अंतर्भाव करून व त्यांच्या दैवतांना आपल्या दैवतांमध्ये स्थान देऊन ब्राह्मणांनी समाजसंवर्धन केले. निरनिराळ्या लोकांना आपली संस्कृती व प्रादेशिक धर्म न सोडता हिंदू समाजाचे घटक होता येई, हा हिंदू धर्माचा एक विशेष आहे. हिंदूंचे धर्मशास्त्र फक्त काही विशिष्ट लोकांकरिता व प्रदेशाकरिता नसून सर्व मानवजातीकरता लिहिलेले आहे. त्यात सर्व जगाच्या कल्याणाची इच्छा बाळगून आचारधर्म सांगितला आहे. ह्या सर्वसंग्राहक व परमतसहिष्णू वृत्तीची ख्रिस्त व महंमद यांच्या अनुयायांशी तुलना करता हिंदूचे श्रेष्ठत्व दिसून येते.
 ख्रिस्ती व महंमदी धर्म इतरांना आपल्यांत आणण्याचा आटोकाट प्रयत्न करितात; पण तसे करताना इतरांनी आपल्या पूर्वीच्या दैवतांचा त्याग करून सर्वस्वी ख्रिस्ती व महंमदी दैवतांचे व धर्मतत्त्वाचे ग्रहण केले पाहिजे असा त्यांचा आग्रह असतो. ह्या असहिष्णू मनुष्यप्रणीत संप्रदायांनी मनुष्यजातीची सर्वांगीण उन्नती होणे असेल, तर आपले आग्रही परस्परद्वेषजनक संप्रदाय नाहीसे होऊन त्या जागी सर्वसंग्राहक; सर्व मानवजातीला लागू पडतील अशा धर्मतत्त्वे प्रचारात आली पाहिजेत; आणि अशी धर्मतत्त्वे हिंदू धर्मात असल्यामुळे हिंदू भारतावर डॉक्टरमहाशयांनी जगाच्या उन्नतीची मोठीच जबाबदारी टाकलेली आहे. हिंदू समाजाची उन्नती करण्यासाठी लहान जाता नष्ट करून चातुर्वर्ण्य ठेवावे, अशी त्यांची ‘हिंदुस्थान आणि जग' ह्या पुस्तकात विचारसरणी आहे; पण पुढे ‘भारतीय समाजशास्त्र' लिहिताना जातिसंस्था व जात्यभिमान ह्याही गोष्टी चांगल्याच आहेत असे प्रतिपादून, त्या संबंध समाजास उपकारक अशी कृत्ये कशी करू शकतील एवढ्याचाच उहापोह केला आहे.
 ‘हिंदुस्थान आणि जग' ह्या विभागात हिंदू समाजव्यवस्थेतील दोष' (पृष्ठ ३८१) ह्या सदराखाली दोषाविष्करण करण्याचा प्रयत्न केला आहे. पण ती न साधता जो मोठा दोष म्हणून म्हटले आहे तो खरोखर तसा नव्हे, अशीच भावना वाचणान्यांची होते. सर्वांत मोठा दोष म्हणजे दृढीकरणाची अल्पता हा होय.