पान:आमची संस्कृती.pdf/96

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
आमची संस्कृती / ८९

समाजाला झालेला एक दुष्ट रोग आहे असेही ते म्हणतात. एखादी गोष्ट दोषरहित नसूनसुद्धा आपल्याला आवडते - आवडते म्हणण्यापेक्षा तिच्याबद्दल आपणास आपुलकी वाटते; पण दुस-या लोकांसमोर ह्या आपुलकीच्या भावनेबद्दल थोडी लज्जा, थोडा अभिमान वाटत असतो, अशी काहीशी द्विधा वृत्ती हिंदूंच्या जातिसंस्थेविषयी केतकरांची ह्या ग्रंथात ठिकठिकाणी दिसून येते. हळूहळू पुढील ग्रंथातून ही द्विधा वृत्ती नाहीशी झाली व हिंदूच्या समाजघटनेविषयी केवळ अभिमान तेवढा शिल्लक राहिला; आणि शेवटी हिंदूंच्या समाजरचनेचे त्यांना एवढे कौतुट वाटू लागले की, अशी रचना ज्या अर्थी दुस-या कोणत्याही समाजाला साधली नाही त्या अर्थी त्यांनी ती हिंदूपासून शिकून घ्यावी व त्यामुळे जगाचे कल्याणच होईल, अशा त-हेची विचारसरणी ‘हिंदुस्थान आणि जग' व 'भारतीय समाजशास्त्र' या त्यांच्या ग्रंथांतून आढळते.
 केतकरांच्या पहिल्याच ग्रंथाचे इतके विवेचन करण्याचे कारण, ह्या निबंधात त्यांनी पुढे इतर ग्रंथांतून विस्ताराने चर्चिलेल्या बहुतेक सामाजिक संस्थांचा व प्रवृत्तींचा उल्लेख केला आहे. तसेच ह्यांत वरील प्रश्नांकडे पाहण्याची केतकरांची जी दृष्टी थोड्या अंशाने ठरून गेली आहे तीच पुढेही कायम राहिली आहे. ह्याच विषयांच्या अनुषंगाने लिहिलेले दुसरे पुस्तक 'Hinduism: its Formation and Future' हेही अतिशय वाचनीय झाले असून ज्ञानकोशातील हिंदुस्थान आणि जग' ह्या विभागात वरील विषयाचीच सांगोपांग चर्चा आली आहे. बुद्धपूर्व जग' ह्या विभागातील अर्ध्या भागात हिंदूंची ग्रंथनिर्मिती व समाजघटना पुन: विस्तारपूर्वक विचारात घेतली आहे; आणि त्यांचे शेवटचे पुस्तक ‘भारतीय समाजशास्त्र' ह्याच विषयाला वाहिलेले आहे. मात्र ज्ञानकोशापर्यंतची त्यांची ग्रंथनिर्मिती व विचारपद्धती बरीच समतोल वृत्तीची आढळते, तर भारतीय समाजशास्त्र' ह्या पुस्तकात केवळ शास्त्रज्ञाची भूमिका जाऊन हिंदू धर्माभिमान्याची भूमिकाच अधिक उठावदार रीतीने दिसते; आणि  'The more he thinks on the caste system, the better he understands his own burden. As one looking at a cancer would like to turn away his eves so a Hindu would like to discontinue his thoughts:/History of Castes in India, P.29. At present the various tribes and castes feel strong repulsion against one another, and this fact is a clear manifestation of our savagery.' (Ibid, p.28).