पान:आमची संस्कृती.pdf/94

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आमची संस्कृती / ८७

लिखाणही स्वतंत्र बुद्धीचे व विचारास चालना देणारे असे आहे; पण दोघांतही अतिरंजकता हा शास्त्रज्ञास न शोभणारा दोष राहून गेला आहे.
 केतकरांनी आपल्या समाजशास्त्रविषयक कामगिरीस 'History of Castes in India' ह्या पीएच.डी.साठी लिहिलेल्या निबंधापासून आरंभ केला, हे वर सांगितलेच आहे. ह्या निबंधात मुख्यत्वे मनुस्मृतीत जातिसंस्थेसंबंधी जे उल्लेख आले आहेत त्यांबद्दल विवेचन आहे आणि पर्यायाने अर्वाचीन जातिसंस्था व प्राचीन वर्णसंस्था ह्यांविषयीही अतिशय उद्बोधक विचार केलेला आहे. ह्या निबंधांत केतकरांनी खालील गोष्टी प्रामुख्याने सांगितल्या आहेत :- चातुर्वर्ण्य हे जातिसंस्थेपासून भिन्न आहे. त्याचा जातिसंस्थेशी जनकत्वाचा संबंध येत नाही. अर्वाचीन जाती धंद्यावरून, देशावरून, संप्रदायावरून वगैरे पडलेल्या आहेत. जातिसंस्थेची उभारणी बहुतांशी पवित्रापवित्रतेच्या कल्पनांवर झालेली आहे. जाती ब्राह्मणांनी उत्पन्न केलेल्या नाहीत, इतकेच नव्हे तर वेद व वेदांगे ह्यांचे ज्ञान असलेल्या मनूला जातिसंस्थेचे अस्तित्व जाणवले, परंतु तिचा विस्तार व कारणमीमांसा मात्र आकळता आली नाहीत. तो स्वतः ब्राह्मण असल्यामुळे निरनिराळ्या जाति व त्यांचे आचार ह्यांचे खोल ज्ञान त्याला नव्हते. त्याला चातुर्वर्ण्य मात्र माहीत होते आणि त्याने जातींची उत्पत्ती देताना स्वत:च्या माहितीच्या ज्या दोन गोष्टी- चातुर्वर्य व वर्णसंकर- त्यांचा उपयोग करून त्यामुळे जाती उत्पन्न झाल्या, असे प्रतिपादन केले आहे; आणि हीच चुकीची मीमांसा आजपर्यंत जातिसंस्थेसंबंधी हिंदू समाजात केली जाते. मनूने निरनिराळ्या जातींना जी प्रायश्चित्ते सांगितली आहेत, त्यांचाही विचार करून निरनिराळ्या जातींमधील उच्चनीचभाव त्यामुळे कसा व्यक्त होतो हे ह्या ग्रंथात कतकरांनी दाखविले आहे. त्यांच्या मते ब्राह्मणव्यतिरिक्त जातींना जी कडक शासने सांगितली आहेत ती नित्य अंमलात येतच होती असे नव्हे. तर केवळ दहशत बसावी म्हणून मनूने कडक भाषा वापरलेली आहे. दुस-या बाजूने ब्राह्मणांना जे अधिकार (न्यायदानाचे काम इत्यादी) असावे असे मन् म्हणतो, ते देणे न देणे राजाच्या इच्छेवर अवलंबून असल्यामुळे ते नेहमीच मिळत असत असेही नाही. विशेषत: क्षत्रिय, वैश्य व शूद्र ह्यांचे अधिकार नेहमीच स्पष्ट व त्यांच्या मर्यादा पूर्णपणे