पान:आमची संस्कृती.pdf/92

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



आमची संस्कृती / ८५

विस्ताराने केलेले ' Religion' ह्या इंग्रजी शब्दावरील मार्मिक भाष्य येऊन गेले आहे. ' Religion' ह्या शब्दाचा अर्थ मराठीत सर्वत्र 'धर्म' शब्दाने जो व्यक्त केला जातो तो बरोबर नव्हे. युरोपात जसा ख्रिस्ती धर्म आहे तसा हिंदुस्थानात हिंदू धर्म नाही. हिंदुस्थानात हिंदू समाज व हिंदू संस्कृती आहे, पण ख्रिस्ती धर्म ह्या अर्थाने अनेक रूढ धर्म आहेत. 'धर्म' शब्दाचा अर्थ पाहता तो 'Religion' ह्या शब्दाला समानार्थी होऊच शकत नाही. ‘पदार्थधर्माचिया शृंखला त्याते कोणी न भेदी', ह्या ओळीमध्ये ‘धर्म शब्दाचा जो अर्थ आहे तो मूळ अर्थ असून मानवधर्मशास्त्रात 'धर्म' म्हणजे मानवाने करावयाची कर्तव्ये ह्या अर्थी तो शब्द आला आहे. इंग्रजीमध्ये ज्याला ' Religion' म्हणतात त्याचे भाषांतर संप्रदाय, मत, मार्ग ह्यांसारख्या शब्दांनी- विशेषतः संप्रदाय' ह्या शब्दाने करता येईल आणि त्या अर्थाने हिंदूचा कोणता तरी एक संप्रदाय नसून अनेक संप्रदाय आहेत, हे त्यांनी स्पष्टपणे दाखविले आहे.
 पूर्वोक्त पहिले इंग्रजी निबंध ज्या काटेकोरपणाने व समतोल बुद्धीने लिहिले आहेत, ते गुण दुर्दैवाने केतकरांच्या पुढील लेखनात आढळत नाहीत. पुढे त्यांच्या लेखनात विविधता आली, त्यांच्या विचारांचे क्षेत्र व्यापक झाले, पण विवेचनात पुष्कळदा कमालीचा निष्काळजीपणा शिरला. ही विचारांची व लेखनाची शिथिलता विशेषत: त्यांच्या भारतीय समाजशास्त्र' ह्या नवीन पुस्तकात जागोजाग पाहावयास सापडते. मानववंशविषयक कोणते शब्द वापरावे ह्याबद्दल केतकरांनी १९०९ साली लिहिलेल्या परिशिष्टाचा उल्लेख वर आलाच आहे. १९११ साली 'Religion' ह्या शब्दाने व्यक्त होणा-या अर्थाचे सूक्ष्म परीक्षण करून त्याला त्यांनी संप्रदाय' हा शब्द सुचविल्याचेही वर सांगितलेच. अशा प्रकारे शास्त्रीय विवेचनात शब्दांच्या अर्थासंबंधी व व्याख्येसंबंधी पराकाष्ठेचा काटेकोरपणा दाखवून प्राचीन भारतीय परंपरा राखणारे केतकर व १९३६ साली लिहिलेल्या भारतीय समाजशास्त्र' ह्या पुस्तकात केवळ भाषाशैथिल्यामुळे जागोजाग घोटाळा उत्पन्न करणारे केतकर हे एकच काय, अशी शंका उत्पन्न होते! प्रस्तुत पुस्तकाच्या १९४ व्या पृष्ठावर आर्य रक्त' असा शब्दप्रयोग त्यांनी केला आहे आणि हिंदु समाजात अनेक मानववंशाचे लोक आहेत असे सांगणाच्या केतकरांनी ‘‘जातीच्या