पान:आमची संस्कृती.pdf/83

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

७६ / आमची संस्कृती

जुनेच, नावे मात्र निराळी. अशा वेळी आगरकरांची आठवण तीव्रतेने होते.ते अशा नावांनी भुलले नसते. लोकशाहीच्या काळात बहुसंख्यांचे राजकारण, अल्पसंख्यांच्या पोटातली भीती व कर्तव्यच्युती ह्यांना त्यांनी वाचा फोडली असती व महाराष्ट्र समाजाच्या एकत्वाची तीव्रतेने जाणीव करून दिली असती. त्याचप्रमाणे महाराष्ट्राभिमान, भारताभिमान हे एकमेकांचे विघातक नसून पूरकच आहेत हे पण त्यांनी दाखवून दिले असते. त्यांचा देशाभिमान जाज्वल्य होता पण त्यांचे सर्व महत्त्वाचे लिखाण मराठी देशबांधवांना उद्देशून होते, ही लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. आगरकरांना सुधारणेच्या बाह्यांगाचे व अंतरंगाचे नीट आकलन होते व आंतरसुधारणा हीच बाह्य सुधारणेचा पाया असे त्यांचे ठाम मत होते. बायकांनी जाकिटे घालावी, पुरुषांनी जोडे घालावे, विधवावपन करू नये अशा किती तरी बाह्य सुधारणांचा त्यांनी जरी पुरस्कार केला. तरी त्याच्या बुडाशी समाजाच्या विचारांचे परिवर्तन हाच मुख्य मुद्दा होता आणि आज त्याच मुद्यावर विचार निर्भीडपणे व अव्याहत मांडण्याची जरूरी आहे. आज समाजसुधारणा व राजकीय वातावरण दंभाने व संशयान जे धूसर झाले आहे ते पुन्हा स्वच्छ करण्यासाठी आगरकरांची आवश्यकता आहे. आज आगरकर आपणांमध्ये नाहीत तरी त्यांचे स्मरण करून त्याच लेख परत परत वाचून सर्व विद्याथ्र्यांनी ते वातावरण निवळण्यास मदत करावी अशी विनंती करून तुम्हांपुढे बोलण्याची संधी दिल्याबद्दल चालकांचे आभार मानून लांबलेले भाषण संपवते.

- १९५६