पान:आमची संस्कृती.pdf/80

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



आमची संस्कृती /७३

समाजाने जरी किती धिक्कार केला तरी शेवटी समाजावर त्याचा परिणाम होतोच होतो. आपलेच माणूस रागे भरले तर ते भलाईमुळे, आपल्या कल्याणासाठी, ह्याची न कळत समाजाला जाणीव असते व रागावून एकमेकांचे वाभाडे निघाले तरी त्यांतून कल्याणच निष्पन्न होते. धर्मांतरामुळे किंवा देशत्यागामुळे व्यक्तीचे प्रश्न सुटतील पण समाजाचे सुटणार नाहीत. समाजात राहूनच समाजाला वळण लावणे हे काही विशिष्ट राजकीय परिस्थितीत शक्य होणार नाही; पण अशी अवस्था जेथे नाही तेथे सुधारकांनी वरील पथ्य काटेकोरपणे पाळले पाहिजे. कितीही रागावले तरी ममत्वाची भावना ढळू देता कामा नये, आणि कितीही ममत्व असले तरी चूक झाली तर रागावण्याचे सोडता कामा नये, अशी ही दुहेरी भूमिका आगरकरांची व त्यांच्या समकालीन महाराष्ट्रीय पुढा-यांची होती. हे पथ्य कठीण का, हे समजणे सोपे आहे. आपले आणि परके ह्यांमधील फरक प्रत्येक व्यक्तीत निरनिराळ्या मार्गाने बिंबतो. पूर्वीच्या मागासलेल्या समाजात तो होता व संस्कृतीने परिपूर्ण असलेल्या समाजातील व्यक्तींतही तो असतो. आपल्याशी वागण्याचे नियम परक्यांशी वागण्याच्या नियमांहून अतिशय भिन्न असतात. ज्याला आपले म्हटले त्याचे सर्व दुर्गुण झाकायचे, त्याने केलेल्या प्रत्येक कृतीचे मंडन करावयाचे हीच तन्हा सर्वत्र दिसून येते. परकीय म्हटला म्हणजे थोडीशी तेढ मनात असतेच. त्याचे उणेदुणे काढण्याची मनोवृत्ती थोडी स्वाभाविक व बरीचशी आपल्या समाजजीवनात जाणूनबुजून पोसलेली असते. अशा वेळी स्वकीयांबद्दल अपरंपार प्रेम बाळगूनही परकीयांचा द्वेष न करणे व स्वकीयांच्या गुणावगुणांचा केवळ सभ्य दृष्टीने शोध करून अवगुणांवर प्रहार करावयाचा व गुणांचे पोषण करावयाचे- परकीयांचे चांगले ते घेऊन केवळ ते राज्यकर्ते किंवा बलशाली म्हणून त्याचे अधानुकरण करावयाचे नाही, हे आचार-नियम ऐकायला जितके सोपे तितकेच कृतीत आणणे कठीण आहे. लोकानुरंजन करून लोकप्रिय पुढारी होणे सोपे असते. अप्रिय पण पथ्यकारक गोष्टी लोकांपुढे मांडून त्यांच्या गळी उतरवणे फार कठीण असते. आजच्या सर्व जातींच्या व सर्व धर्माच्या सुशिक्षित तरुण पिढीने हे पथ्य पाळले तरच स्वराज्याचे सुराज्य होईल; तरच मागासलेल्या जमाती वरती येतील, एरवी नाही.