पान:आमची संस्कृती.pdf/8

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आमची संस्कृती / १


१. संस्कृती म्हणजे काय?



 संस्कारपूर्ण, संस्कारमय जीवन जगण्याची देशकाल-विशिष्ट रीत म्हणजे संस्कृती, अशी सुरुवातीस व्याख्या केली तर ती कळणे कठीण जाईल; कारण परत 'संस्कार' शब्दाची फोड नीटपणे केली पाहिजे. सध्या सुरूवातीची व्याख्या म्हणून ही चालेल. ह्यातील 'संस्कार' कशाला म्हणायचे ते पाहू.

संस्कारांचे प्रकार
 पृथ्वीवरील सर्व वस्तूंवर संस्कार घडत असतात. सर्व वस्तू एकमेकांवर क्रिया-प्रतिक्रिया करीत असतात. पावसाने दगड झिजतो, माती भिजते, बीज अंकुरते. उन्हाने दगड फुटतात, बीज वाढीस लागते, पिकते व वाळते. दगडावर दगड आपटतो, फुटतो, नदीच्या प्रवाहाने वाहत जाऊन त्याचे गोटे होतात. पृथ्वीवर व पृथ्वीवरील वस्तूंवर प्रत्यही असे संस्कार होत असतात. पृथ्वीचे व पदार्थांचे रूप ह्या संस्कारांमुळे सारखे पालटत असते. पण आज ज्या संस्कारांचा आपणास विचार करावयाचा आहे ते हे नव्हेत. ही सदैव पालटणारी पृथ्वी मनुष्याच्या संस्कारित जीवनाची पार्श्वभूमी आहे.
 हजारो वर्षे चालूनचालून माणसांच्या पायाने मंदिराच्या पायऱ्या