पान:आमची संस्कृती.pdf/71

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



आमची संस्कृती / ६५

त्यांनी प्रतिपादिलेल्या ब-याचशा सुधारणा आज घडूनही आल्या आहेत; पण इतके असूनही त्यांचे निबंध आजही आवडीने वाचावेसे वाटतात; कारण, अमक्या तमक्या विशिष्ट आचारविचारांत सुधारणा झाली पाहिजे, एवढेच त्यांचे प्रतिपादन नसून सबंध समाजाच्या कल्याणाची त्यांना तळमळ आहे व ते कल्याण कसे साध्य करावयाचे त्या मार्गाचे त्यांनी केलेले विवेचन आजही मार्गदर्शक आहे- नव्हे आजच्या स्वातंत्र्याच्या कालात ते पूर्वीपेक्षाही जास्त लागू पडते. ते म्हणतात “धर्म, राज्य व सामाजिक व्यवहार यांतील भेद एकसमयावच्छेदेकरून होणारा आहे.समाजाच्या एकाच बुडख्याला ह्या तीन खांद्या किंवा हे तीन अंकुर एकदम फुटतात. आजच्या कालात हे तत्त्व इतके सर्वसामान्य आहे की, प्रत्येक राजकीय पक्षाची घोषणा ही समाजरचनेबद्दलची मूलभूत घोषणा होऊन बसली आहे. समाजवादी राज्यपद्धती' हे शब्दच ह्या नव्या वृत्तीचे द्योतक आहेत. दुर्दैवाने एका बाबतीत आजची पिढी आगरकरांच्या फारच मागे आहे. ती म्हणजे वरील त्रयीपैकी धर्माची- विशाल अर्थाने म्हणायचे म्हणजे क्रियेच्या मागे नीतीची किंवा धर्माची- जी घट्ट न ढळणारी भावना पाहिजे, तिचा विचार होत नाही. साध्य काय ह्याबद्दल ब-याच अंशी एकमत असूनही साधनांबद्दल दुफळी तरी माजते किंवा जाणूनबुजून लोकांच्या डोळ्यांत धूळ फेकली जाते. हा दंभ किंवा ढोंगीपणा यावर आगरकरांनी आग पाखडली होती. आपणही तसेच करावयास पाहिजे. आगरकर ज्या सुधारणा हव्या म्हणत होते त्या मिळाल्या, टिळकांनी ज्या स्वराज्यासाठी जिवाचे रान केले तेही मिळाले. पंचशील, लोकशाही राज्यपद्धती, समाजवाद, सत्य आणि अहिंसा ह्या तत्त्वांचा प्रत्येक व्यासपीठावरून जयजयकार चालला आहे. इतके असूनही प्रत्येक विचारवंत महाराष्ट्रीयाचे मन अंधाराने भरून राहिले आहे. आगरकरांनी प्रतिपादिलेली मुख्य सुधारणा झाली नाही. 'धैर्य नाही, उत्साह नाही, खरा देशाभिमान नाही, खरी धर्मश्रद्धा नाही. अहोरात्र क्षुद्र स्वार्थावर दृष्टी लागली असल्यामुळे आपल्या विचाराचा व आचाराचा भावी संततीवर काय परिणाम होईल त्याचा कोणीही फारसा विचार करीत नाही,' असे ते ‘गुलामांचे राष्ट्र' या लेखांत म्हणतात ते आजही खरे आहे. आम्हा गुलामांचे कपडे बदलले, बायका शिकू लागल्या; कारण आम्हांला हे सर्व