पान:आमची संस्कृती.pdf/61

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

५४ / आमची संस्कृती

बाबतीत केलेले विवेचन फार मार्मिक व मार्गदर्शक आहे. हिंदूचे एक असे दैवत नाही, एकच असा आचार नाही व मुक्तीचे साध्य साधण्यासाठी सांगितलेली साधनेही अनेक आहेत, असे हिंदू धर्माचे लक्षण लोकमान्य करतात. हिंदुस्थानचा गेल्या तीन हजार वर्षांचा इतिहास हेच पुन्हा पुन्हा सिद्ध करतो.
 आपले स्वत:चे आचारधर्म आपण पाळावे व इतरांना त्यांचे पाळू द्यावे अशी प्रथा प्राचीन काळापासून भारतात अद्ययावत चालू आहे.
 ह्याच कारणामुळे अनेक चालिरीती भारतात दिसतात. काही जमाती मांस खातात, काही खात नाहीत; काहींत मामा किंवा आत्याच्या मुलीशी लग्ने करतात, काहींत सर्व तऱ्हेचे निकट सापिंड्य लग्नाच्या बाबतीत निषिद्ध आहे; बऱ्याच जातींत स्त्रिया चोळी घालतात, तर काहींच्यात ही चाल निषिद्ध आहे; एक ना दोन, अशी उदाहरणे हजाराने सांगता येतील. एकाच समाजात राहणाऱ्या लोकांनी एकमेकांच्या भिन्न व्यवहाराबद्दल सहिष्णुता बाळगणे हे एक कर्तव्य आहे. ज्या वेळी एखाद्या व्यवहारामुळे एखाद्या व्यक्तीच्या व समाजाच्या न्याय्य व्यवहाराला अडथळा येईल, तेव्हाच अशा स्वातंत्र्याला राजाज्ञेने बंध घालता येईल. एखाद्या समाजाला आपले काही व्यवहार योग्य वाटले नाहीत, तर त्यांवर बंदी घालता येईल; एरवी दुसऱ्याचे न आवडणारे व्यवहार बंद करावयाचे असल्यास मतपरिवर्तन तेही दांडगाईन नव्हे हाच एक मार्ग न्याय्य व शिष्टसंमत आहे.

देवळांचे हिंदू समाजातील स्थान

 हिंदूचे सर्व थोर राजे ह्याच न्यायाने वागत आले. परकी राजांनी केलेली कृत्ये ह्याच कारणामुळे जुलमी व सर्वथैव निंद्य ठरली. दुर्दैव एवढेच की ह्या जुलमी व निंद्य प्रकाराला समाजातील सर्व शक्ती एकवटून प्रतिकार फार वेळा झाला नाही. प्रत्येकाने आपल्या मनाप्रमाणे आपल्या दैवताची पूजा करावी हे हिंदू धर्माचे तत्त्व आहे. त्याप्रमाणे वागणूक ठेवताना इतरांनी आमच्या दैवतांचे व मंदिरांचे पावित्र्य भ्रष्ट करता कामा नये, त्यासाठी प्राण खर्चा करू ही भावना हिंदूनी दाखविली नाही. नाहीतर हिंदू मंदिरांच्या मूर्तीची मोडतोड व त्या जागी चर्च व मशिदी ह्यांची स्थापना होती ना. ह्या बाबतीत असेही म्हणता येईल की, हिंदूची दैवतपूजा कौटुंबिक स्वरूपाची होती. त्यामुळे