पान:आमची संस्कृती.pdf/52

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

४४ / आमची संस्कृती

 प्रांतिक संस्कृतीत सामावून घ्या


 शक्य तितक्या लवकर सर्व दृष्ट्या त्यांना इतर भारतीयांबरोबर आणणे इष्ट आहे. त्यांच्यावर सावकार, जमीनदार वगैरेंचे आक्रमण होऊ नये, सरकारी अधिकारी व जंगल कॉन्ट्रॅक्टर यांच्याकडून त्यांना उपद्रव पोचू नये, म्हणून जी दक्षता घ्यावयाची ती दक्षता सर्वच निरक्षर मागासलेल्या जमातींच्या बाबतीतही घ्यावयाची असल्यामुळे, इतर लोककल्याणाची जी खाती आहेत त्यांतच त्यांच्या खात्याचाही समावेश व्हावा. गोंड, भिल्ल, उराव, कोया वगैरे संख्येने मातबर असलेल्या जाती तीन चार भाषिक प्रांतांतून विभागलेल्या आहेत. गोंडी, भिली, कुरुख व कुयी अशा चार भाषा हे लोक बोलतात व त्याशिवाय प्रादेशिक भाषाही उत्तम बोलतात. गोंड मध्यप्रदेशात हिंदी बोलतात, नागपूर प्रांतात व पश्चिम आदिलाबाद जिल्ह्यात मराठी बोलतात, तेलंगणाच्या भागात तेलगू बोलतात. बस्तारमध्ये मुख्यत्वेकरून गोंडी बोलतात. भिल्ल प्रांतपरत्वे गुजराथी, राजस्थानी व मराठी भाषा बोलतात. उराव कुरुखखेरीज हिंदी व उडिया बोलतात. तीच गोष्ट कोयांची, मुंडांची व खोंडांची. एका जमातीची भाषा दुसरीला येत नाही, इतकेच नव्हे तर वन्य जमातींना एकमेकांचे अस्तित्वहीं माहीत नाही. या सर्व भाषा निरक्षर आहेत. म्हणजे त्यांना लिपी नाही व लिहिलेले वाङ्मय नाही. अशा परिस्थितीत ज्या ज्या प्रांतांच्यामध्ये किंवा शेजारी वन्य येतील त्यांत त्यांना समाविष्ट करून त्या त्या प्रांतिक संस्कृतीत त्यांना सामावून घेणे हाच मार्ग योग्य दिसतो. पण सरकारचे धोरण या बाबतीत निश्चित असे काही ठरलेले नाही. कुठल्या एका विशिष्ट तत्त्वावर त्या प्रश्नाचा विचारच झाला नाही. जुने युरोपीय शास्त्रज्ञ भारतीय परिस्थिती न कळल्यामुळे किंवा दुसऱ्या काही हेतूने जे म्हणत आले त्याला अजूनही आपले सरकार काही अंशाने चिकटून आहे. युरोपीय शास्त्रज्ञांच्या म्हणण्याचा सारांश असा की, वन्य हे वन्येतरांपासून वेगळे व अलिप्त ठेवले पाहिजेत. सुदैवाने हा विचार हल्लीच्या राजवटीत तितक्या जोरात कोणी उच्चारीत नाही, पण वन्यविषयक धोरण मात्र बघऱ्याच प्रमाणात त्या विचारप्रणालीचे द्योतक वाटते.