पान:आमची संस्कृती.pdf/51

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आमची संस्कृती /४५


एकत्र करण्याचा उपदव्याप

 भारतीय इतिहासात कित्येक मोठमोठ्या जमाती दूरदूरवर पसरलेल्या आढळून येतात. त्या आता आपापल्या प्रांतांशी समरस झालेल्या आहेत. फक्त नावामुळे किंवा ऐतिहासिक संशोधनाने त्यांचे मूळ ठिकाण काय ते कळून येते. त्या जमातींना एकत्र करावे व त्यांच्या पूर्वकालीन एकतेची जाणीव त्यांना करून द्यावी असे कोणीही आज म्हणणार नाही. एवढेच नाही तर ती एकात्मता आता येणेही शक्य नाही. स्वत:ला अहिर म्हणवणाच्या जाती काठेवाडपासून तो तहत बिहारपर्यंत पसरलेल्या आहेत. असिरगड (अहिरगड), ग्वालगड, अहिराणी भाषा वगैरे गोष्टी, त्यांचे एके काळचे वैभव व वर्चस्व दाखवतात. तीच गोष्ट 'गुजर' ह्या जमातीची; तीच कथा स्वत:स कायस्थ म्हणवणाच्या जातीची. ह्या जमाती कधीकाळी एके ठिकाणी असतील पण आज मात्र ज्या प्रांतात आहेत तेथील भाषा व संस्कृती त्यांनी आत्मसात केली आहे. हाच प्रकार बहुप्रांतिक गोंड व भिल्ल लोकांचा आहे. असे असताना मांडला वगैरे जिल्ह्यांतले गोंड बस्तार गोंडांना जवळ आणण्यासाठी मध्यप्रदेशाच्या सीमा वाढवून थेट तेलंगणापर्यंत नेऊन भिडवणे म्हणजे गोंडांचे कल्याण साधणे नसून तेलंगण महाराष्ट्राचे नाक कापून भारतास धोक्यात घालणे आहे. आज खानदेशातील भिल्लाला महाराष्ट्राचा व मराठीचा अभिमान वाटतो. गुजराथी भिल्लाला गुजरातबद्दल वाटतो. म्हणजे भिल्ल ही त्या त्या प्रांतातली एक जमात झाली आहे व तिचे संरक्षण व कल्याण करण्याची जबाबदारी त्या त्या प्रांतांवर पडली. गोंडांच्या बाबतीतही तेच व्हावयास पाहिजे. गोंड नावाची जमात मध्यप्रदेशात आहे, महाराष्ट्रात आहे, तेलंगणात आहे, ओरिसात आहे, ही माहिती मानवशास्त्राच्या अभ्यासकाला होती, पण गोंडांना नव्हती व ती असावयाचे कारणही नाही. जे ते गोंड आपापल्या प्रदेशांत राहत होते, सोयरीक करीत होते, प्रादेशिक भाषा आत्मसात करीत होते, पण गोंडांचे कैवारी म्हणवणाच्या काही लोकांनी त्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला. हैदराबादी राज्यांत मराठी लोकांना उर्दूत शिकावे लागे पण गोंडांसाठी गोंडी भाषेत पुस्तके लिहिली गेली; व ती शिकण्यासाठी शाळा स्थापल्या गेल्या. मुंडा प्रदेशातील मिशनच्यांनी हाच उपदव्याप करून मुंड लोकांना एकतेची नव्याने जाणीव