पान:आमची संस्कृती.pdf/4

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

दुसऱ्या आवृत्तीच्या निमित्ताने...


 'आमची संस्कृती' या पुस्तकाची दुसरी आवृत्ती प्रदीर्घ कालावधीनंतर प्रकाशित होत आहे. डॉ. इरावती कर्वे यांनी सन १९४८ ते १९६० च्या दरम्यान लिहिलेले लेख या पुस्तकात समाविष्ट झालेले आहेत.
 भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एका नव्या समाजव्यवस्थेची निर्मिती हे प्रमुख आव्हान भारतीय नेतृत्वापुढे होते. या आव्हानाला आर्थिक, धार्मिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक असे अनेक पदर होते. या संदर्भात नवी मूल्ये, नवी कायदेप्रणाली निर्माण करणे समाजधुरिणांना आवश्यक वाटत होते या निमित्ताने समाजात जे विचारमंथन चालू होते, त्याचे दर्शन आपल्याला या पुस्तकातील विविध लेखांतून होते .
 शास्त्रज्ञाकडे केवळ बुद्धिमत्ता व संशोधनातील चिकाटी असेल तर तो आपल्या क्षेत्रात यशाची शिखरे गाठू शकतो, पण याच्या जोडीला त्याच्याकडे उपजत शहाणपणा, न्याय बुद्धी, सामंजस्य आणि मूल्यांची जाणीव असेल तर त्याचे लिखाण आणि त्याचे आयुष्य हे समाजापुढे आदर्श म्हणून राहतात.
 हे लेख वाचत असताना डॉ. इरावती कर्वे यांची ही भूमिका आणि वैशिष्ट्ये आपल्याला अतिशय स्पष्टपणे समजून येतात.