पान:आमची संस्कृती.pdf/37

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आमची संस्कृती/ ३१

पोषाखाचे स्थान प्राप्त झाले. मोगलांचे षोक श्रीमंत हिंदूंनी उचलले; मोगल शिल्पकला हिंदूंनी उचलली; असे कितीतरी परिणाम हिंदू जीवनावर मुसलमानी अंमलामुळे झाले. पण हिंदू समाजजीवन मूलत: जसे होते तसेच राहिले. अनेकदैवतवाद, ब्राह्मणांचे पूज्यत्व, काही जातींची अस्पृश्यता, गाईंचे पावित्र्य, गणित व ज्योतिष, न्याय, तर्क, शरीरशास्त्र, तत्त्वज्ञान, काव्य, नाट्य ही सर्व होती तशीच राहिली. उलट जे मुसलमान समाज पंजाब-दिल्लीपासून दूर होते ते उत्तरोत्तर आचारविचारांत हिंदूमध्ये विलीन होतील की काय अशी भीती मुसलमान पुढाऱ्यांना वाटू लागली. इंग्रजी राजवटीत इंग्रजी भाषा व अधिकाराच्या जागा, तसेच राष्ट्रीय पुढारीपण, हिंदूंच्या हाती आले. संबंध मुसलमान समाज हिंदूंच्या मानाने मागासलेला राहिला. मुसलमान सत्ता आली आणि गेली. पण हिंदू समाज पूर्वी होता तेथेच राहिला.
 इंग्रजांचे आक्रमण, त्यांची ही शतकाचीच पण सर्व हिंदुस्थानभर एकछत्री सत्ता व तितक्याच अल्पावधीत त्यांचे तडकाफडकी प्रयाण ह्या तीन घटनांतून संक्रान्त झालेला हिंदू समाज पाहिला तर काय दिसून येईल? इंग्रजांचे सांस्कृतिक ऋण काय? इंग्रज आले व गेले, आम्ही मात्र होतो तसेच राहिलो, असे म्हणता येईल का?
 पूर्वी कोणत्याही राज्यकर्त्यांचे नव्हते असे एकछत्री मध्यवर्ती राज्य भारतावर इंग्रजांनी केले. कोट्यवधी परकीयांवर थोड्या वेळांत परिणामकारक रीतीने त्यांना सत्ता प्रस्थापित करावयाची होती. त्यांना या परकीयांच्या विलक्षण धर्मात फारशी ढवळाढवळ करण्याची इच्छा नव्हती. संबंध युरोप खंडाएवढा देश व त्यांतील निरनिराळ्या भाषा यांच्या संस्कृतीची जोपासना करावयाची नव्हती. म्हणून त्यांनी स्वत:च्या भाषेच्या शाळा काढल्या व त्यांना हवा असलेला हलकासलका अधिकारीवर्ग तयार केला. होता होईतो त्या प्रांतांचे अधिकारी त्या प्रांतातच न नेमण्याची ते खबरदारी घेत. हिंदुस्थानातील कोठल्याही प्रांतातील मनुष्याला वाटेल तितक्या लांबच्या प्रांतात नोकरी करण्याची शक्यता उत्पन्न झाली; व निरनिराळ्या प्रांतांतून भरती झालेला पण नेमणुका व बदल्या या निमित्ताने सर्व हिंदुस्थानातील मोठमोठ्या शहरी जाऊन-येऊन राहणारा असा एक आंतरप्रांतीय नवीनच वर्ग तयार झाला.