Jump to content

पान:आमची संस्कृती.pdf/36

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आमची संस्कृती / २९

३. साहेब आणि आमची संस्कृती

 इंग्रज हिंदुस्थानात प्रादेशिक आक्रमण करू लागले त्या सुमारास भारत दुसऱ्या एका आक्रमणातून मुक्त होण्याच्या मार्गावर होता. सहा-सात शतके हिंदुस्थानच्या निरनिराळ्या भागांवर राज्य करणारी मुसलमानी सत्ता हिंदूंनी खिळखिळी करून टाकली होती. इंग्रज आले नसते तर काय झाले असते ह्याबद्दल तर्कट करण्याचे आपल्याला काही कारण नाही. पण मुसलमानांच्या जवळजवळ एका सहस्रकाच्या संघर्षानंतरचा हिंदुस्थान व दीड शतकाच्या इंग्रजी आमदानीनंतरचा हिंदुस्थान ह्यांची थोडक्यात तुलना करणे आवश्यक आहे.
 महंमदी धर्माचा प्रसार इतक्या झपाट्याने झाला की, महंमदाच्या मरणानंतर पांच-सहा शतकांतच मुसलमानांनी अटलांटिकच्या किनाऱ्यापासून तो पिवळ्या समुद्रापर्यंत आपले पाय पसरले. खुद्द युरोपातून त्यांना माघार घ्यावी लागली. चीनमध्ये त्यांच्या धर्माचा म्हणावा तसा प्रभाव पडला नाही, पण भूमध्यसमुद्रापासून तो चीनच्या सरहद्दीपर्यंतचा प्रदेश बहुतेक सर्वस्वी महंमदी बनला. हा पट्टी बहुतेक अर्धसंस्कृत भटक्या टोळ्यांचे वसतिस्थान होते. खुद्द टायग्रिस युफ्रेटिसच्या दुआबात कित्येक वर्षशतांच्या संस्कृतीचे, काही शहरांतून काही ग्रीक व रोमन लोकांच्या वसतीचे अवशेष तेवढे शिल्लक राहिले. इराणही