पान:आमची संस्कृती.pdf/30

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.आमची संस्कृती / २५

प्रमाणात घोड्याला महत्त्व देऊन त्याचे मांस खाण्याची प्रथा ख्रिस्तपूर्व संस्कृतीत रूढ होती. परंतु प्रेषितांनी घोड्याचे मांस खाणे हे निषिद्ध ठरविले. पूर्वीच्या लग्नपद्धती, पूजा, खाणपिणे, कपडेलत्ते इत्यादी सर्व गोष्टींचा मोड करून नवीन पंथाचे एकत्व प्रस्थापित करण्याकडे यांचा रोख असे. त्यांच्याकडूनं अनेक दैवतांस थारा मिळणे अशक्यच होते.

 परंतु हिंदुस्थानात मात्र अनेकांच्या वैशिष्ट्यांस बाध न आणता एक प्रकारचे समावेशक एकत्व प्राप्त झालेले दिसते. अनेकत्वातून एकत्वाची प्रचिती हे हिंदी संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. हे वैशिष्ट्य येथील लोकांच्या रोमरोमांत भिनलेले दिसून येते. सर्वाभूती ज्याप्रमाणे अंतिम चित्तत्व जे ब्रह्म ते मीच आहे असे मानणाच्या ब्रह्मवाद्यालाही काही बाह्योपचार, दैवत-पूजा ही असेच!

 दक्षिण दिशा ही वाईट, राक्षसांची; तेव्हा दुष्ट राक्षस जो रावण तो दक्षिणेकडचा असावा हे ठीक आहे. पण त्यालाही आपल्यात समाविष्ट करून घेण्याची तडजोडीची वृत्ती त्याला ब्राह्मण मानण्यांत दिसून येते. तुम्हीही राहा, आम्हीही राहू ही सहिष्णु वृत्ती सर्वत्र दिसते. मध्यंतरी बुद्ध किंवा महावीर यांच्या पंथाचा प्रसार होऊ लागला तेव्हा या वृत्तीला बाध येण्याची वेळ आलेली होती. कारण बुद्धाच्या निर्वाणकल्पनेत दैववादाला जागा नाही. वासनात्याग करून आत्मक्लेश, चिंतन यांच्या साहाय्याने शेवटी ज्ञान प्राप्त करून घेणे, या कल्पनेला दैवतांची कल्पना कशी मानवणार? परंतु मौज अशी की, बौद्ध पंथाचा प्रसार हिंदुस्थानात पुष्कळ झाला, अशोकासारख्या सम्राटाचे, त्याच्या प्रबळ आणि विस्तीर्ण राज्यसत्तेचे पाठबळ त्याला मिळाले, तरी शेवटी बुद्ध स्वत:च एक दैवत होऊन बसला! 'तारा'सारख्या यक्षिणीची दैवत म्हणून पूजा त्यांच्या पंथातही राहिली आणि आमच्या लोकांनी तर बुद्धाला विष्णूचा नववी अवतार बनवून साफ पचवून टाकला! चीन जपानमध्येही तो दैवतच झाला.

 जिनाच्या पंथांत दैवतवादाला थारा नाही. परंतु तेथेही त्याचे चोवीस तीर्थंकर हेच दैवते बनून त्यांची व इतर काही क्षुद्र दैवतांचीही पूजा शिल्लक राहिली. विंध्यवासिनीदेवी हे मोठेच दैवत त्या पंथात मानले गेले.

 सर्वसंग्राहक अनेकदैवतवादाला बहुतेक समाजशास्त्रवेत्ते रानटी मानतात. तसे का मानावे कळत नाही. अनेक दैवतांची लाज वाटावी असे