पान:आमची संस्कृती.pdf/29

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आमची संस्कृती / २३

नव्हती. म्हणून राजकीय व धार्मिक सत्तेच्या केंद्रीकरणाचा अभाव' हे हिंदी सांस्कृतिक इतिहासाचे दुसरे ठळक लक्षण मानावे लागते.

 संस्कृति-संगम करण्याकडे प्रवृत्ती
 हजारो वर्षांपासून बाहेरचे लोक हिंदुस्थानात प्रवेश करीत आलेले आहेत, परंतु भिन्नभिन्न संस्कृतींचा इतका दीर्घकालीन संपर्क होऊनही त्यांतून एका संस्कृतीला पूर्णपणे दडपून टाकून किंवा तिला नाहीशी करून दुसरी जिवंत राहावी इतका तीव्र संस्कृतिसंघर्ष कधीच निर्माण झालेला नाही. एका बाजूला जुने एतद्देशीय व दुसऱ्या बाजूला नवे परकीय यांत नेहमी सांस्कृतिक तडजोडच होत आली आहे. यामुळे जी परंपरा परिणत झाली तिच्यात सर्व संस्कृतीची मूलतत्त्वे जिवंत राहिली आहेत. तडजोड हा हिंदी संस्कृतीचा आत्मा आहे. आपल्या विशिष्ट संस्कृतीचा प्रचार करण्यासाठी कुरुपांचालांनी कधी दौरे काढले नाहीत. ते जसजसे इतर प्रदेशात पसरले तसतसा त्यांचा दुसऱ्या लोकांशी संबंध येऊ लागला, आचारधर्मात फरक पडू लागला. या समावेशक वृत्तीच्या दृष्टीने हिंदुस्थानातील अनेक दैवतवाद विचार करण्यासारखा आहे. अनेक दैवते मानीत असल्यामुळे हिंदूंच्या दैवतांच्या संख्येत नेहमी भरच पडत आली आहे. 'शिव' या अवैदिक दैवताला वेदांतील सूर्यदेवाचेच दुसरे स्वरूप जे 'विष्णू' त्याच्या बरोबरीचे स्थान मिळालेले आहे. यक्ष, किन्नर, भुतेखेते, खोडसाळ आणि रोगराई उत्पन्न करणारी दैवते, नद्या, धबधबे, पर्वत यांची दैवते इत्यादी आदिमानवांची दैवते येथे अनादि कालापासून जीव धरून आहेत; शिवं व विष्णू यांच्या बरोबरीने खेडेगावांतून सर्व जातीचे लोक आजतागायत त्यांची पूजाअर्चा करून त्यांस भजत आले आहेत.
 या अनेकदैवतवादाचा पाया गणले जाणारे सर्वांभूती परमेश्वर मानण्याचे तत्त्वज्ञान हे फार सहिष्णू आहे. वैवाहिक किंवा अन्य कोणत्याही बाबतीतला वागणुकीचा एखादा प्रकार हा एकदा एखाद्या गटाची प्रस्थापित परंपरा म्हणून सिद्ध झालेला असला. म्हणजे त्याला मान्यता मिळत आली आहे. बहपतित्व आणि बहुपत्नित्व, पितृप्रधान व मातृप्रधान कुटुंबपद्धती, अनेक दैवतांची पूजा, देवस्की, चार्वाकमत ही सर्व देशाच्या विभागात अस्तित्वात असलेली आढळतात. कधीकधी तर एकाच विभागात