पान:आमची संस्कृती.pdf/28

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आमची संस्कृती / ३१

त्यांच्या चालिरीती, त्यांचे तत्त्वज्ञान, त्यांच्या नीतिकल्पना या सर्वांविषयी एक प्रकारचा आपुलकीचा अभिमान दिसून येतो आणि मुख्य म्हणजे या सर्व गोष्टी आजही कोठे ना कोठे प्रचलित असलेल्या आढळून येतात. अखंडित परंपरा हें हिंदूच्या सांस्कृतिक इतिहासाचे पहिले ठळक लक्षण म्हटले ते यासाठीच.

 राजकीय व धार्मिक सत्तेच्या केंद्रीकरणाचा अभाव-
 ब्रिटिश राजाच्या आधी हिंदुस्थानात सर्वांसाठी सारखा कायदा करून त्याची अंमलबजावणी करील अशी प्रबळ, केंद्रीय राज्यसत्ता कधीच नव्हती. 'साम्राज्ये' पुष्कळ झाली, परंतु एक तर त्यांचा विस्तार संबंध हिंदुस्थानभर कधीच झाला नाही आणि जेवढ्या भागात झाला तेवढ्या भागात त्या साम्राज्यसत्तेचा अंमल सबंध लोकांच्या दैनंदिन जीवनक्रमांबर क्वचितच होत असे. खेडेगावातील लोकांस राजसत्तेचे अस्तित्व क्वचितच, फार तर कर भरण्याच्या वेळी जाणवत असे. एरव्ही कोणती राजसत्ता तर आली नि कोणती गेली याचे पडसाद त्यांच्या जीवनाच्या अगदी गाभ्यापर्यंत पोचत नसत. बऱ्याच अंशी स्वयंपूर्ण अशा प्रादेशिक गटागटांमधून लोकांचे विशिष्ट प्रकारचे जीवन अबाधितपणे चालू राहत असे. कधी मित्रभावाने, तर बहुधा शत्रूभावाने एकमेकांशेजारी नांदणारी अनेक लहानलहान राज्ये, असेच या देशांतील राजसत्तेचे स्वरूप शतकानुशतके असलेले दिसून येते. हल्ली जशी काही संस्थाने अगदी लहान अशी दिसून येत असत, त्याप्रमाणे प्राचीन काळी पुष्कळ राज्ये अगदी लहान, एखादे शहर किंवा तालुका एवढ्याच विस्ताराची असत. प्राचीन घोषयात्रांची वर्णने हेच दर्शवितात. आपल्या राज्याच्या सीमेपर्यंत जाऊन परत येण्यास कित्येक घोषांस दोन दिवससुद्धा पुरे होत असत आणि तेही पूर्वीच्या वाहतुकीच्या तुटपुंज्या साधनांच्या काळात! दिग्विजय करणारे मोठमोठे राजे घेतले तरी तेसुद्धा दुसऱ्या राजाने त्यांचा वरचढपणा मान्य केला की खूष असत. तांत्रिक स्वामित्व प्रस्थापित करून, थोडीबहुत खंडणी वसूल करून, ते पुढे जात. परंतु लोकांच्या सांस्कृतिक जीवनावर परिणाम व्हावा अशी प्रबळ केंद्रीय राजसत्ता कधी नव्हती. एक अशोकाचे राज्य मात्र भारतातील केंद्रीय सत्ता म्हणून दाखविण्याजोगे आहे. तीही