पान:आमची संस्कृती.pdf/20

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१२ / आमची संस्कृती

बालविवाह, सती, विधवा-वपन, अस्पृश्यता ह्या गोष्टींची निर्मिती एक किंवा काही व्यक्ती मिळून झालेली नाही. व्यक्ती कितीही पाताळयंत्री, आपमतलबी व बुद्धिसागर असली तरी जातिव्यवस्था निर्माण करणे तिला शक्य नाही. केंद्रित राज्यसत्तेचा अभाव, निरनिराळ्या टोळ्यांचे आगमन, अव्याहत चाललेला झगडा व त्यात काही जमातींना मिळालेला विजय, बहुदैवतवाद, यज्ञीय कर्मकांड व त्या अनुषंगाने निर्माण झालेला सोवळ्या-ओवळ्याचा विचार व कर्मठपणा, श्रमविभाग, कारागीर जातींचे संघ वगैरे हजार गोष्टी एकत्र येऊन हळूहळू जातिसंस्थेला सध्याचे रूप आले.
 संस्कृतीच्या अंगोपांगांचा असा एक नियम आहे की, ती एकमेकांना बळकटी आणतात. वाङ्य, धर्म, तत्त्वज्ञान ही सर्व संस्कृतीची अंगे असतात असे नव्हे, तर तिला ती उचलून धरीत असतात. जाती व त्यांतील उच्चनीच भाव दृढ झाल्यावर कधीतरी पुरुषसूक्त रचले गेले. देवाचे वर्णन मनुष्य तरी आपल्यावरूनच करणार. प्रचलित समाजव्यवस्था व त्यांतील मूल्ये अध्याहृत धरूनच सामान्य मनुष्य उपमा व उत्प्रेक्षा देतो. विराट पुरुषाचे वर्णन समाजरूपी पुरुषासारखे झाले ह्याचा अर्थ त्यावेळी समाजव्यवस्था तशी होती व तिची तरफदारी करण्याचा प्रयत्न कवीकडून नकळत झाला. त्याचप्रमाणे प्रचलित समाजव्यवस्थेतील अन्याय्य भेदांची मीमांसा त्यावरून करून त्यांची तरफदारी करण्याचा मात्र प्रयत्न झाला. पूर्वीच्या जन्मांतील पापामुळे ह्या जन्मी हीन जातीत जन्म येतो, असे म्हणून प्रचलित अन्यायाची तरफदारी झाली व जातिसंस्थेला बळकटी आणण्याचे प्रयत्न झाले. स्त्रियांच्या बाबतीत समाजाचा जो अनुदार दृष्टिकोन होता व आहे, त्याबद्दलही अशीच मखलाशी होते; पण स्त्रियांच्याबद्दलचे कायदे कोणी एका व्यक्तीने जाणूनबुजून केले असे म्हणणे सर्वथैव चूक होईल.
 ह्या विवेचनाचा अर्थ असा नव्हे की, समाजव्यवस्थेत दोषास्पद असे काही नाही. ह्याचा अर्थ एवढाच की, समाजव्यवस्थेत किंवा एखाद्या संस्कृतीत चांगले वाईट जे आढळते तिला विशिष्ट व्यक्ती किंवा वर्ग हे फारसे जबाबदार नसतात. संस्कृती बनत असते- अप्रत्यक्षपणे प्रत्येकजण ती घडवीत असतो व त्या प्रमाणात प्रत्येकाचा त्यांत हात असतो. पण इतिहासातील कोठल्याही कालखंडाचा विचार केला तर असे आढळेल