पान:आमची संस्कृती.pdf/184

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.१७६ / आमची संस्कृती

दुष्ट व अपराधी आहोत असे वाटू लागते. फॉर्म दिलेल्या मुलांत नक्की पास कोण होतील व नक्की नापास कोण होतील त्याचा अंदाज (तिमाही, सहामाही व नऊमाही परीक्षांच्या निकालावरून) बांधून त्याच्या याद्या केल्या व दोन वर्षे हा अंदाज कितपत बरोबर येतो ते पाहिले; तर असे दिसून आले की, जवळजवळ शंभर टक्के अंदाज बरोबर आला. फॉर्म ज्यांना मिळत नाही ती तर सर्वस्वी नालायक असतात. त्यांना फॉर्म न देणे म्हणजे त्यांच्या आईबापांचे परीक्षेच्या फीचे पैसे वाचवणे होते.
 काही मुले वर्षभर किंवा वर्षाचा बराचसा भाग खरोखरच कशा ना कशा तरी आजाराने ग्रासलेली असतात. ती कुठच्याच परीक्षांना सबंध बसलेली नसतात. लेक्चरचे व प्रॅक्टिकलचे त्यांचे बरेचसे तास बुडालेले असतात. त्यांचे व त्यांच्या आईबापांचे म्हणणे असे की, उरलेल्या वेळात ती रात्रीचा दिवस करून अभ्यास करतील व पास होतील. कॉलेजच्या पहिल्या वर्षाच्या परीक्षेत ती नापास झाली तर आजारी म्हणून त्यांना पास करून घ्यावे असा आग्रह होतो. आजारीपण ही काही अंशी आपत्ती असते; त्यामुळे कर्तव्य करता आले नाही तर सहानुभूती वाटेल, पण कर्तव्य पार पाडल्याचे सर्टिफिकेट कसे देता येणार? शिवाय ब-याच वेळा हे आजारीपण हलगर्जीपणामुळे किंवा निव्वळ मानसिक कारणांमुळे येते असा अनुभव ब-याच विद्यार्थ्यांबाबत आलेला आहे. ह्या विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला नसतो व ते परीक्षेच्या आधी काही दिवस किंवा नेमके त्या दिवशी आजारी पडतात. त्यांना फणफणून ताप येतो. आजार खराखुरा असतो, पण त्याचे कारण मात्र रोगजंतू किंवा डास नसून त्याचे अपराधी मन असते. आपण कर्तव्य केले नाही ह्या अपराधाच्या जाणीवेतून निसटून जाण्यासाठी ते शरीराला रोगी बनवते व शरीराकडे बोट दाखवून म्हणते, ‘काय करावे हो, आयत्या वेळी आजारी पडलो!' (मानसशास्त्रष्ट्या ही उदाहरणे फारच अभ्यासनीय असतात व नीतिशास्त्रष्ट्या अतिशय मननीय असतात.)
 मुले व आईबाप ह्यांचे परस्पर संबंधही त्या प्रकरणाचा गुंता वाढवतात. स्वत:चे पोट मारून, जीवापलीकडे कष्ट करून आईबाप मुलांचे शिक्षण करतात. मुलांबद्दलचे त्यांचे प्रेम त्यांना खरोखर वेडे करून टाकते. तारतम्य, सदसदविवेक, व्यवहार सर्व काही ह्या प्रेमाच्या प्रवाहात