पान:आमची संस्कृती.pdf/183

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.आमची संस्कृती / १७७

बुडून जातात. माझा मुलगा उनाडला, त्याने अभ्यास केला नाही म्हणून तो नापास झाला, हे सत्य त्यांना कधीही दिसत नाही. मुलगा सर्व परीक्षांत जेमतेम तिस-या वर्गात पास झाला आहे, त्याची बुद्धी बेताचीच आहे, हे त्यांना कधीही उमजत नाही. मुलगा खोटे बोलून फसवीत आहे हे प्रमाणे देऊन सिद्ध केले तरी ते कधीही पटत नाही.

 ‘मुलगा हुशार आहे पण-'
 मुलगा हुशार आहे हे पालुपद काहींचे असते. चारही परीक्षांत मूल नापास आहे असे दाखविले तर म्हणतात, तिमाही-सहामाहीत नसेल अभ्यास केला, पण आता करील व पास होईल. मुलगा प्रॅक्टिकलला आला नाही, तास चुकवतो, असे पत्र घातले तरीही तिकडे लक्ष देत नाहीत. मुलगा नेमाने जात असे; चुकून हजेरीबुकात नाव राहिले असेल असेही एका पित्याने सांगितले! मुलगा वर्गात गैरहजर राहतो असे एका पालकांना कळवले तर त्यांनी मुलाचे नाव त्या कॉलेजातून काढून त्याला दुसरीकडे घातले. मुलगा नापास झाला हे कळल्याबरोबर येऊन प्रिन्सिपॉलना भेटून कच्चा विषय नीट करून घेण्यास काय उपाय योजावे ह्याची चर्चा करून त्याप्रमाणे करणारेही एकदोन लोक भेटले. पण अशी आईबापे अपवादात्मकच. काही मुले परीक्षेच्या रिझल्टचे कार्ड कधी येणार ते हेरून ते आईबापांच्या हातीच न लागू देण्याची चलाखी दाखवतात. सर्वात वाईट वाटते ते हे की, अशा त-हेच्या मुलाखती घेण्यासाठी आईबापांना पुढे करून मुले बहुधा मागेच राहतात.
 काही मुले इतकी आत्मकेंद्रित असतात की, त्याचा सदसदविवेक जागा करणे मोठे कठीण होऊन बसते. एका मुलाने परीक्षेत कॉपी केली होती, म्हणून त्याला एक वर्ष परीक्षेला बसू न देण्याची शिक्षा झाली होती एक दिवस घरी पत्र आले की, "हे पत्र तुम्ही वाचीत असाल त्या वेळी मी मेलेला असेन. झालेल्या प्रकारामुळे मी आत्महत्या करण्याचे योजले आहे." पत्र वाचून हृदयात विलक्षण कालवाकालव झाली. बिचारा आईबापांपासून दूर. काय भलतेच करून बसला, अशी हुरहूर वाटली. पत्रावर सुदैवाने पत्ता होता. त्याचे बि-हाड शोधून काढले. सुदैवाने त्या मुलाने आत्महत्या केली नव्हती. त्याला बोलावून घेतले व झाल्या