पान:आमची संस्कृती.pdf/179

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१७२ / आमची संस्कृती

 पास-नापासांची सीमारेषा
 पास म्हणजे काय ह्याचा जरा विचार करू या. शेकडा तेहतीस टक्के मार्क मिळाले की एका विषयात पास--म्हणजे विषय बहुतांश (सदुसष्ट टक्के) माहीत नसला तरी पास! एखाद्या चांभाराने वहाण सदुसष्ट टक्के बिघडवली तर तुम्ही ती घ्याल का? एखाद्या आचा-याने शंभरात फक्त तेहतीस जिलब्या चांगल्या केल्या तर तुम्ही त्याला पैसे द्याल का? शेतक-यांनी कामचुकारपणा करून फक्त एकतृतीयांशच शेते पिकविली तर ते व त्यांच्याबरोबर सर्व भारतही नष्ट व्हावयास वेळ लागणार नाही. शेतकरी, चांभार, हमाल, कोष्टी वगैरे निरक्षर गरीब शंभर टक्के काम करून समाजाला पोसतात, अंगभर वस्त्र लेववितात आणि विद्यार्थ्यांना मात्र समाजाला मोबदला म्हणून तेहतीस टक्के मेहनतसुद्धा करवत नाही का?
 हे तेहतीस टक्के सुद्धा वास्तविक तेहतीसपेक्षा कमी असतात. पाच प्रश्न घातले ते सर्वच्या सर्व सोडवले व त्यांतून तेहतीस टक्के मार्क मिळाले असे कधीच नसते. विद्यार्थ्याने जितके प्रश्न सोडवायचे असतात त्यांच्यापेक्षा चाळीस टक्के प्रश्न जास्त काढावे लागतात. पुष्कळदा काढलेल्या प्रश्नांच्या निम्मेच प्रश्न सोडवले तरी काम भागते. सबंध वर्षभर शिकवलेला विषय दहा प्रश्नांत कसा आटोपता येईल? त्यांतूनही त्या दहा प्रश्नांतील कोणतेही पाच सोडवायचे म्हणजे तर कित्येक विभाग सर्वस्वी सोडून देता येतात. जे पाच प्रश्न सोडवले त्यांतील तेहतीस टक्के म्हणजे त्या विषयाचे ज्ञान झाले- नव्हे तो विषय थोडा कळला असे म्हणता येईल का?
 विषयाच्या ज्ञानाची ही तयारी विद्यार्थ्यांना पुरे वाटते, पण त्यांना कामाला लावणा-यांना ती अगदीच तोकडी वाटते. नॅशनल केमिकल लॅबोरेटरीमध्ये विद्यार्थी निरनिराळ्या जागांसाठी अर्ज करतात. सर्व बी.एस्सी. पास; पण मुलाखतीमध्ये रसायनशास्त्राबद्दल विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देता येत नाहीत. दोनचार कारखानदारांनी बी.एस्सी. मुले ज्ञानात किती तोकडी असतात ते मुद्दाम घरी येऊन उदाहरण देऊन सांगितले व "काय हो, हे सुद्धा का तुम्ही शिकवीत नाही?" म्हणून खोट्या साळसूदपणे विचारले. त्यांना काय उत्तर देणार?