पान:आमची संस्कृती.pdf/176

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
आमची संस्कृती / १६९

 वर्षाच्या शेवटी शिकवलेल्या सर्व विषयांची आमूलाग्र परीक्षा घ्यावयाची म्हणजे एका वेळी हजार-दीडहजार पानांतील निरनिराळ्या विषयांवरील विवेचन ध्यानात ठेवावे लागते. विषयाची सर्वसाधारण कल्पना असूनही एखादाच प्रश्न अगदी तंतोतंत न आला तर बरेच मार्क जातात. त्याऐवजी अधूनमधून निबंधलेखन व तिमाही, सहामाही अशा परीक्षा घेतल्या तर शिकणे व परीक्षा घेणे ह्या दोन्ही क्रिया बरोबरीने चालू राहतील. वार्षिकला बसणारा विद्यार्थी सर्व विषयांतं सर्व परीक्षांत पास असला पाहिजे; म्हणजे वार्षिकला फक्त शेवटच्या तिमाहीत झालेल्या भागावर बहुसंख्य प्रश्न व एखाददोन पूर्वीच्या उजळणीचे प्रश्न असा पेपर काढता येईल.
 असे करण्याने प्रत्येक वेळचा पेपर दोनतीन प्रश्नांचाच राहील, विषय मोजका राहील व वर्षाशेवटी ३३ टक्के ज्ञानावर पास न होता विद्यार्थी ५५ ते ८० टक्के ज्ञानावर पास होईल. शिवाय वारंवार परीक्षा व निबंधलेखनामुळे विद्यार्थ्याना पहिल्यापासून अभ्यास करावा लागेल व अध्यापकाला पहिल्यापासून नीट व नियमित शिकवून दर तिमाहीला नेमलेला विषय संपवावा लागेल.
 असल्या परीक्षेला दोन गोष्टी अवघड आहेत. विद्यार्थी नापास झाला म्हणजे त्याला खालच्या विभागात राहावे लागेल. वरच्या विभागात परत मोजक्या भागाची परीक्षा असल्यामुळे नापास विद्याथ्र्याला वर ढकलून चालणार नाही. दुसरे, अशा नापास विद्यार्थ्यांच्या शिकवणीची व्यवस्था करावी लागेल.
 काही वर्षांत परीक्षा न घेता वर्षांच्या परीक्षा, हजेरी व निबंधलेखन ह्यांच्यावर विद्यार्थ्यांना वर चढवण्यास हरकत नसावी. उदाहरणार्थ, कॉलेजातले पहिले वर्ष व बी.ए.चे पहिले वर्ष. मात्र असे करताना शिकवणी नीट होते की नाही, हजेरी व निबंधलेखन ह्यांत कसूर झाली नाही ना व सर्व परीक्षांचा निकाल योग्य लागला नाही, ह्यांकडे लक्ष पुरविले पाहिजे.
 शिक्षण व परीक्षा हे दोन नसून एकाच कार्याचे विभाग आहेत हे समजले तर मुलांच्या परीक्षा घेणारे व निबंधलेखन करणारे व शिक्षक एकच असावेत याबद्दल दुमत होऊ नये. विद्यार्थी कॉलेजात आला की, हजेरीपटावर एक नाव व नंबर ह्यापलीकडे शिक्षकाला त्याची ओळख नसते. पण त्याचे तोंड